इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – बेरोजगारी आणि विकासचा अनुशेष असलेल्या राज्यांमधील तरुण भरकटत असून, समाजविघातक कृत्यांकडे आकर्षित होत आहेत. आसाममध्ये अशाच घटना घडत आहेत. अनेक युवक घरदार सोडून दहशतवादी संघटनेत सहभागी होत असल्याचे वृत्त नुकतेच समोर आले आहे. आता तर पक्षाचे कार्यकर्तेसुद्धा राजकारण सोडून संघटनेत सहभागी होत असल्याचे समोर आले आहे.
आसाममध्ये एका युवक काँग्रेसच्या नेत्याने राजकारण सोडून दहशतवाद्यांशी हातमिळवणी केली आहे. तिनसुकिया जिल्हा युवक काँग्रेस उपाध्यक्ष जनार्दन गोगोई याने बंदी घातलेल्या युनायटेड लिबरेशन फ्रंट ऑफ आसाम (स्वतंत्र) अर्थात उल्फा या दहशतवादी संघटनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. फेसबुकवर पोस्टच्या माध्यमातून त्याने ही माहिती दिली आहे.
टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, गोगोई हा सादिया गावातील रहिवासी असून त्याने पत्नी रीमा हिच्या नावाने फेसबुक पोस्ट लिहिली आहे. फेसबुक पोस्टमध्ये तो म्हणतो, की “मी म्यानमार येथील उल्फा या संघटनेत प्रवेश केला आहे. आपल्या जवळच्या नागरिकांना उद्ध्वस्त होण्याची वाट पाहू शकत नाही. कारण ते आपल्याच राज्यात असहाय्य आहेत. आमची संस्कृती, आमची भाषा आणि ओळख व्यवस्थितपणे मिटवली जात आहे.”
राज्याचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा सांगितले, की ” ४७ तरुण आणि तरुणींनी यूएलएफए (आय) मध्ये नुकताच प्रवेश केला आहे. परंतु अनेक वरिष्ठ सदस्यांनी संघटना सोडली आहे.” बंदी घातलेल्या या संघटनेत सहभागी होऊ नका, असे आवाहन मुख्यमंत्री सरमा यांनी वेळोवेळी केले आहे. राज्यातून गायब झालेले अनेक युवकांनी यूएलएफए-आयमध्ये प्रवेश केला आहे, अशी शक्यता राज्याचे पोलिस महासंचालक भास्कर ज्योती महंत यांनी व्यक्त केली आहे.
बेरोजगारीला कंटाळून अनेक युवक दहशतवादी बनत आहेत, असे काँग्रेसचे खासदार गौरव गोगोई यांनी म्हटले आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, युवकांना आकर्षित करण्यासाठी यूएलएफए-आय संघटनेकडून फेसबुक आणि यूट्यूबसारख्या ऑनलाइन प्लॅटफॉर्मचा वापर केला जात आहेत. परंतु अशी कोणतीच मोहीम चालवली जात नसल्याचे संघटनेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.