नाशिक – कोरोनाच्या संकटात खासगी हॉस्पिटलही संधीसाधूपणा करुन सर्रास आर्थिक लूट करीत असल्याच्या वारंवार तक्रारी आहेत. यासंदर्भात नाशिक महापालिकेने केलेल्या लेखापरीक्षणात ही बाब स्पष्ट झाली आहे. त्यामुळेच रुग्णांचे तब्बल ४ कोटी रुपये परत मिळवून देण्यात नाशिक महापालिकेला यश आले आहे.
नाशिक महापालिकेचे मुख्य लेखापरीक्षक बी जे सोनकांबळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, लेखापरीक्षण विभागाकडून ८६ खाजगी कोविड रुग्णालयातील देयके तपासण्यात आली. त्यानंतर सुमारे साडे चार कोटी रुपयांची अवाजवी आकारणी करण्यात आल्याचे स्पष्ट झाले. ही रक्कम रुग्णांच्या देयकातून कमी करण्यात आल्याचे सोनकांबळे यांनी सांगितले आहे.
नाशिक महानगरपालिकेच्यावतीने खाजगी कोविड रुग्णालयाकडून रुग्णांना आकारण्यात येणाऱ्या अवाजवी देयकांची तपासणी करण्यासाठी ८६ कोविड रूग्णालयात लेखापरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. ८ एप्रिल पर्यंत ४२ हजार ७०८ रूग्णांना खासगी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. त्यापैकी संबंधित मनपा नियुक्त लेखापरीक्षकांनी १६ हजार ८०२ इतकी देयकांची (बिलांची) तपासणी करण्यात आली. या लेखापरीक्षणात स्पष्ट झाले की, खासगी रुग्णालयांनी तब्बल ४ कोटी ३० लाख १५ हजार ८७२ रुपयांची रक्कम अवाजवी आकारली होती. ती रक्कम देयकातून कमी करण्यात आली आहे. उर्वरित २५ हजार ९०६ ही मेडिक्लेमची देयके असल्याचे सोनकांबळे यांनी सांगितले आहे.
३ महिन्यातील कार्यवाही
जानेवारी ते ८ एप्रिल पर्यंत एकूण ११ हजार ६३१ रूग्णांना खासगी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यापैकी संबंधित मनपा नियुक्त लेखापरीक्षकांनी ३ हजार १९३ एवढ्या देयकांची तपासणी केली. त्यात ६४ लाख १८ हजार ९२७ रुपये इतकी रक्कम ही खासगी रुग्णालयांकडून अवाजवी आकारण्यात आल्याचे दिसून आले. अखेर ही रक्कम देयकातून कमी करण्यात आली आहे. उर्वरित ८४३८ ही मेडिक्लेमची देयके होती.
तुम्हालाही तक्रार करायची असेल तर खालील क्रमांकावर संपर्क साधावा