नवी दिल्ली – नाशिकमध्ये महापालिकेच्या हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन गळती होऊन २२ कोरोना बाधितांचा जीव गेला. या दुर्घटनेप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. या दुर्घटनेची स्वतंत्र चौकशी करावी, अशी मागणी करण्यासाठी मुंबईतील स्वयंसेवी संस्था सेव्ह द इंडिया फाऊंडशनने ही याचिका दाखल केली आहे. सर्वौच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश आणि उच्च न्यायालयाचे दोन माजी न्यायाधीश अशा त्रिसदस्यीय समितीच्या माध्यमातून या दुर्घटनेची चौकशी व्हावी, अशी मागणी संस्थेने केली आहे. अक्षम्य हलगर्जीपणामुळे ही दुर्घटना घडली आणि २२ जणांना जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे दोषींना शिक्षा होणे आवश्यक आहे. त्यासाठीच स्वतंत्र चौकशी समिती स्थापन व्हावी आणि निष्पक्षपणे याप्रकरणाचे सत्य सर्वांसमोर यावे, असा आमचा हेतू असल्याचे संस्थेने म्हटले आहे.