नाशिक – शहरातील ४ खाजगी रुग्णालयांना नाशिक महापालिकेने नोटिस बजावली आहे. या रुग्णालयांकडे दाखल असलेल्या ८० % बेड वरील कोरोना रुग्णांची देयके नियुक्त लेखा परीक्षकांना तपासणीसाठी देण्यात आली नाही. तसेच, मनपाने वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे पालन न केल्याबाबत नोटिसा देण्यात आली असल्याची माहिती मुख्य लेखा परीक्षक बी. जे. सोनकांबळे यांनी दिली.
नाशिक महानगर पालिकेच्या वतीने शहरातील खाजगी रुग्णालयांमध्ये ८०% बेड वर कोरोनाचे रुग्ण दाखल होतात. त्यानंतर त्या रुग्णांना डिस्चार्ज होण्याच्या वेळी शासन दराने खाजगी रुग्णालयांनी देयके आकारणी कराला हवीत. ती केली आहे की नाही याची खात्री करण्यासाठी रुग्णालय निहाय लेखापरीक्षकांची नियुक्ती मनपाने केली आहे. त्या लेखा परिक्षकांकडे १ एप्रिल २०२१ पासून अद्याप पावेतो देयके तपासणीसाठी न दिल्याची तक्रार नियुक्त लेखापरीक्षकांकडून मनपाला प्राप्त झाली होती. त्या अनुषंगाने त्या खासगी रुग्णालयांची पाहणी मुख्य लेखा परिक्षक यांच्यासह पथकाने केली. मनपाने वेळोवेळी केलेल्या सूचनांचे पालन केलेले नसल्याचे त्यात आढळून आले. तसेच दर्शनी भागात लेखापरीक्षकांची नाव व मोबाईल नंबरचा फलक लावलेला नाही, अशा स्वरूपाच्या नियमांचे पालन न केल्याचेही स्पष्ट झाले. त्यामुळेच १) रामालयम हॉस्पिटल, दिंडोरी रोड,पंचवटी, २) मानस हॉस्पिटल, तुपसाखरे लॉन्स, मुंबई नाका, ३) साईनाथ हॉस्पिटल, अशोक नगर, सातपूर आणि ४) जीवन ज्योती हॉस्पिटल, त्र्यंबक रोड, सातपूर या ४ रुग्णालयांना नोटीस देण्यात आली आहे. १ एप्रिल २०२१ पासून २३ एप्रिलपर्यंत ८०% बेड वरील कोरोना रुग्णांची देयके ३ दिवसात तपासणीसाठी उपलब्ध करून देण्यात यावे, असे त्यामध्ये नमूद केले आहे. ती उपलब्ध न करून दिल्यास रुग्णालय व्यवस्थापन विरुद्ध साथरोग अधिनियम १८५७, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम-२००५,महाराष्ट्र कोविड-१९ उपाययोजना नियम २०२० नुसार कार्यवाही करण्यात येईल, असा इशारा सोनकांबळे यांनी दिला आहे.