नाशिक – गेल्या काही दिवसांपासून ऑक्सिजन बेडसाठी प्रचंड वणवण करणाऱ्या नाशिककरांसाठी मोठी दिलासादायक बातमी आहे. शहर परिसरात तब्बल ४०० ऑक्सिजन बेड आता उपलब्ध होणार आहेत. यासाठी सॅमसोनाईट या कंपनीने पुढाकार घेतला आहे.
ऑक्सिजन बेड संदर्भात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. संदीप फाऊंडेशनचे प्राचार्य डॉ. प्रशांत पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, आता नाशिक शहरात ४०० नवीन ऑक्सिजन बेड तयार होणार आहेत. सॅमसोनाईट कंपनीच्यावतीने एकूण ४ सरकारी हॉस्पिटलमध्ये ४०० बेड करता लागणारे ऑक्सिजन पाईप लाईन आणि कनेक्शनसाठी २५ लाख रुपयांची मदत केली आहे.
यासंदर्भात नाशिकचे सिव्हिल सर्जन यांच्याशी चर्चा करण्यात आली. ऑक्सिजन बेड नक्की कुठे हवेत, याबाबत माहिती घेण्यात आली. त्यानंतर उमेश राठी यांना याबाबत मदत करण्यास सांगण्यात आले. त्यांनी त्वरित सॅमसोनाईट कंपनीशी संपर्क साधला. कंपनीचे प्लान्ट हेड यशवंत सिंग यांना यासंबंधीची माहिती देण्यात आली. त्यांनी त्वरित हाँगकाँग येथील हेड ऑफिसकडून संबंधित खर्च मंजूर करून घेतला. आता येत्या ४-५ दिवसात शहरातील सिव्हिल हॉस्पिटल, सातपूर येथील ईएसआय, पंचवटीतील आयुर्वेदिक कॉलेज आणि मुक्त विद्यापीठात हे ऑक्सिजन बेड तयार केले जाणार आहेत. या चारही ठिकाणी ऑक्सिजन बेडसाठी लागणारी सर्व व्यवस्था केली जाणार आहे. तशी माहिती डॉ. पाटील यांनी दिली आहे.