नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (NSA) अजित डोवाल यांच्या सुरक्षेतील त्रुटी प्रकरणी मोठी कारवाई करण्यात आली आहे. केंद्र सरकारने तीन कमांडोना डोवाल यांच्या सुरक्षा व्यवस्थेतून हटविले आहे. गेल्या फेब्रुवारी महिन्यात अजित डोवाल यांच्या सुरक्षेचा भंग झाला होता, जेव्हा कारमधील एका अज्ञात व्यक्तीने त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी पोलिसांनी त्या व्यक्तीला ताब्यात घेतले होते.
डोवाल यांच्या व्हीआयपी सुरक्षेशी संलग्न उपमहानिरीक्षक (डीआयजी) आणि कमांडंट यांची बदली करण्यात आली आहे. ज्या व्यक्तीने अजित डोवाल यांच्या उच्च सुरक्षा निवासस्थानात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. ती व्यक्ती लाल रंगाच्या एसयूव्ही कारमध्ये आली होती. वेळीच कार अडवण्यात आली आणि डोवाल यांच्या घराचे रक्षण करणाऱ्या केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या (CISF) जवानांनी त्या व्यक्तीला पकडले.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांच्या चौकशीदरम्यान शंतनू रेड्डी नावाच्या व्यक्तीने दावा केला होता की, त्याच्या शरीरात चीप आहे आणि ती बाहेरून नियंत्रित केली जात होती. मात्र, एमआरआय स्कॅनमध्ये त्याच्या शरीरात कोणतीही चिप आढळून आली नाही. हा व्यक्ती बेंगळुरूचा रहिवासी असून तो मानसिकदृष्ट्या अस्वस्थ असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले होते. त्याने नोएडा येथून कार भाड्याने घेतली होती. अजित डोवाल यांना केंद्र सरकारकडून झेड प्लस सुरक्षा मिळाली आहे. ही घटना घडली तेव्हा डोभाल त्यांच्या निवासस्थानी उपस्थित होते. आता या प्रकरणी तीन कमांडोंना हटविण्यात आले आहे.
NSA Ajit Doval Security Commando Action Government