कोल्हापूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – श्रीक्षेत्र नृसिंहवाडी येथे कन्यागत महापर्वकाल निधीतून बांधण्यात आलेल्या बहुमजली पार्किंग इमारतीचे लोकार्पण उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते संपन्न झाले.
नृसिंहवाडी या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी होणारी भाविकांची गर्दी लक्षात घेता येथे बांधण्यात आलेल्या पार्किंग इमारतीमुळे पार्किंगची चांगली सोय होणार आहे. 6 कोटी 63 लाख रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या या पार्किंग इमारतीमध्ये 270 वाहनांच्या पार्किंगची सोय होणार असल्याने भाविकांना याचा लाभ होईल.
तीर्थक्षेत्र विकास विशेष कार्यक्रमांतर्गत नृसिंहवाडी येथे बांधण्यात आलेल्या पार्किंग इमारतीच्या लोकार्पण सोहळा कार्यक्रमास उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या समवेत कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील, सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील- यड्रावकर, नृसिंहवाडीच्या सरपंच पार्वती कुंभार, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, तहसीलदार अपर्णा मोरे-धुमाळ यांच्यासह मान्यवर पदाधिकारी, ग्रामस्थ व भाविक उपस्थित होते.
तळमजला, पहिला मजला व टेरेसवर प्रत्येकी 90 अशा एकूण 270 चारचाकी वाहनांची पार्किंग व्यवस्था या इमारतीमध्ये करण्यात आली आहे. तळमजला व पहिल्या मजल्यावर 180 वाहनांचे बंदिस्त पार्किंग तर टेरेसवर 90 वाहनांचे ओपन पार्किंगची सोय केली आहे. या इमारतीत वाहन आत येण्यासाठी व बाहेर पडण्यासाठी वेगवेगळे मार्ग ठेवले आहेत.
दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे श्री दत्ताचे दर्शन घेतले. तसेच येथे सुरु असलेल्या विविध विकास कामांची माहिती घेतली.