मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – तुम्हीही व्हॉट्सअॅप वापरत असाल तर तुम्हीही पैसे कमवू शकता. कारण, व्हॉट्सअॅप आता आपल्या यूजर्सना कॅशबॅक देण्याची तयारी करत आहे. अधिकाधिक भारतीयांना त्याच्या पेमेंट सेवेकडे आकर्षित करण्यासाठी व्हॉट्सअॅप कॅशबॅक रिवॉर्ड्स देण्यात येणार आहेत. कंपनी यासाठी टेस्टिंग करत आहे. व्हॉट्सअॅपला गुगलसह इतर प्रतिस्पर्ध्यांशी स्पर्धा करायची असल्याने वेगवेगळ्या फिचर्सवर लक्ष दिलं जात आहे.
व्हॉट्सअॅपची ही नवीन सुविधा भारतातील १० करोड वापरकर्त्यांना मिळू शकेल. नियामक मान्यता मिळाल्यानंतर या बाबी प्रत्यक्षात येतील. सूत्रांनी सांगितले की, व्हॉट्सअॅप मे महिन्याच्या अखेरीस त्याच्या पेमेंट सेवेवर युझर्सनी केलेल्या ट्रान्सफरसाठी ३३ रुपयांपर्यंतची कॅशबॅक ऑफर लाँच करेल, या कॅशबॅकमुळे लोकं व्हॉट्सअॅपचा वापर पैशांच्या देवाणघेवाणीसाठी करायला लागतील असं कंपनीला वाटत आहे. व्हॉट्सअॅपवरुन थेट टोल आणि युटिलिटी आणि इतर बिले भरण्याची सुविधादेखील दिली जाणार असून त्यावरदेखील कॅशबॅक मिळू शकणार आहे. व्हॉट्सअॅपची डिजिटल पेमेंट मार्केटमध्ये गुगल पे, पेटीएमआणि फोनपेशी स्पर्धा आहे. भारतात डिजिटल पेमेंटसाठी याच माध्यमांना पसंती दिली जात असते. व्हॉट्सअॅपने यापूर्वीही पेमेंट पर्यायाची माहिती सामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला होता. परंतु, त्याला तितकासा प्रतिसाद मिळाला नसल्याने कॅशबॅकसारख्या योजना आणून ग्राहकांना वळवण्याचा प्रयत्न केला जात आहे.
पेमेंटसाठी वापरकर्ते व्हॉट्सअॅपवर जाऊ शकतात!
व्हॉट्सअॅप कॅशबॅकची रक्कम कमी वाटू शकते, परंतु काउंटरपॉइंट रिसर्चचे संशोधन उपाध्यक्ष नील शाह म्हणाले की वापरकर्त्यांनी व्हॉट्सअॅपकडे देवाणघेवाणीसाठी स्विच करण्याचे हे एक कारण असू शकते. रॉयटर्सच्या एका प्रश्नाच्या उत्तरात दिलेल्या निवेदनात, व्हॉट्सअॅप म्हणाले की ते “व्हॉट्सअॅपवर पेमेंटची क्षमता अनलॉक करण्याचा मार्ग म्हणून टप्प्याटप्प्याने आमच्या वापरकर्त्यांना कॅशबॅक इन्सेन्टिव्ह ऑफर करण्याची मोहीम चालवली जात आहे.”