मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महागडे पेट्रोल आणि डिझेलचे चटके सोसणाऱ्या सर्वसामान्यांना आता रस्त्यावरून वाहनाने जाण्यासाठी आणखी खिसा मोकळा करावा लागणार आहे. आज (दि. १ एप्रिल) मध्यरात्रीपासून देशभरातील टोलनाक्यांवर टोल टॅक्सचे दर वाढणार आहेत. सरकारने टोल टॅक्सला घाऊक किंमत निर्देशांकाशी (WPI) जोडले आहे. त्यामुळे प्रवाशांसाठी कोणत्याही अतिरिक्त सोयीसुविधा वाढवल्या जात नसल्या तरी राष्ट्रीय महामार्गांवर टोल टॅक्समध्ये ८ ते १२ टक्क्यांनी दरवर्षी वाढ मात्र होत आहे.
भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) चे प्रादेशिक अधिकारी (ROs) वैयक्तिक राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांच्या टोल दरात वाढ करण्यासाठी अधिसूचना जारी करतात. विभाग घाऊक किंमत निर्देशांकाच्या प्रमाणात टोल दर वाढवतो. त्यानुसार आज रात्री १२ वाजल्यापासून टोल कंपन्या ८ ते १२ टक्के टोलचे वाढलेले दर लागू करणार आहेत. यामध्ये खासगी आणि व्यावसायिक वाहनांचे कराचे दर वेगवेगळे आहेत. हे वाढलेले दर १० रुपयांपासून ४० रुपयांपर्यंत असणार आहेत.
देशभरात ८१६ टोलनाके आहेत. टोल टॅक्सला घाऊक किंमत निर्देशांकाशी जोडण्याचे सरकारचे धोरण तज्ज्ञांनी चुकीचे मानले आहे. तज्ज्ञांना असे वाटते की घाऊक किंमत निर्देशांक महागाईशी संबंधित आहे. पण वर्षभरात महामार्ग महाग कसे होऊ शकतात? याशिवाय वाहनांच्या विक्रीत दरवर्षी १० ते १२ टक्क्यांनी वाढ होत आहे. महामार्ग प्रकल्पाची किंमत आणि त्यावरील दैनंदिन वाहतुकीतून मिळणारे उत्पन्न याच्या आधारे टोलचे दर ठरवले जातात.
तांत्रिक बाब म्हणजे वाहनांची संख्या वाढल्याने टोलचे दर खाली यायला हवेत. त्याचप्रमाणे प्रकल्पाची किंमत वसूल केल्यानंतर करात ४० टक्के सूट मिळावी, असा नियम आहे. मोठ्या प्रमाणात महामार्ग प्रकल्प आहेत, ज्याचा खर्च टोल कंपन्यांनी वसूल केला आहे. मात्र रस्त्यावरील प्रवाशांना सवलत दिली जात नाही. या सगळ्या प्रकारामुळे सामान्यांच्या खिशाला चटका बसतो आहे. महागाईने देशातील नागरिक हैराण झाले आहे. महागाई कमी व्हावी असे त्यांना मनोमन वाटते आहे. पण महागाई कमी होण्याऐवजी कोणत्या ना कोणत्या कारणाने खिसा रिकामाच करावा लागत असल्याने नागरिकांमध्ये नाराजी पसरली आहे.