विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली
कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे सर्वच क्षेत्रांवर अतिशय गंभीर परिणाम होत आहेत. शिक्षण क्षेत्रही त्याला अपवाद नाही. कोरोनाचा प्रादुर्भाव अद्यापही कायम असल्याने जेईई अॅडव्हान्स २०२१ ही परीक्षा स्थगित करण्याचा निर्णय झाला आहे. या प्रवेश परीक्षेद्वारे विद्यार्थ्यांना इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अर्थात आयआयटी मध्ये प्रवेश मिळतो. या परीक्षेची विद्यार्थी अत्यंत आतूरतेने वाट पाहतात आणि त्यासाठी जीवापाड मेहनत करतात. इयत्ता १२वी नंतर ही परीक्षा घेतली जाते. मात्र, यंदा कोरोनाचे संकट अजूनही सरलेले नाही. त्यातच इयत्ता १२वीच्या परीक्षा लांबणीवर पडल्या आहेत. त्या कधी होतील, याची अद्याप स्पष्टता नाही. अशातच जेईई अॅडव्हान्स ही परीक्षा स्थगित करण्याचे शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल यांनी जाहिर केले आहे. त्यामुळे आता ही परीक्षा नक्की कधी होईल, याची कुठलीही स्पष्टता झालेली नाही. तसेच, केंद्र सरकारने जेईई मेन्स ही परीक्षाही स्थगित करण्याचे यापूर्वीच जाहिर केले आहे. जेईई अॅडव्हान्स ही परीक्षा येत्या ३ जुलै रोजी घेतली जाणार होती. मात्र, कोरोना संकटाची सद्यस्थिती लक्षात घेऊन ही परीक्षा स्थगित करण्यात येत आहे. नव्या तारखांची घोषणा योग्य वेळी केली जाईल, असे आदेश काढण्यात आले आहेत.