विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली
कोरोनाबाधित लोकांना जीवघेण्या बुरशीजन्य आजारांचा संसर्गही होत आहे. ज्याच्यामुळे डोळ्याची दृष्टी जाऊ शकते. दिल्लीत आतापर्यंत पाच मोठ्या रुग्णालयांमध्ये बाराहून अधिक रुग्ण आढळले आहेत. अनियंत्रित मधुमेह, टोसिलिजुमॅबचा वापर आणि रोगप्रतिकारक शक्ती कमी झाल्याने म्यूकोरमायकोसिसचा संसर्ग होऊ शकतो. त्यामुळे कोरोनासह इतर संसर्ग होत असल्याने लोकांनी सतर्कता बाळगणे गरजेचे आहे, नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल यांनी सांगितले.
मधुमेही रुग्णांनी शरीरातील शुगरचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागणार आहेत. योग्य सतर्कता बाळगल्यास या संसर्गाला रोखता येऊ शकते असे पॉल म्हणाले. कोरोना किंवा कोणत्याही प्रकारचे संसर्ग अनियंत्रित मधुमेही रुग्णांना धोकादायक ठरू शकतात. त्याशिवाय टोसिलिजुमॅब औषध कोरोनाच्या गंभीर रुग्णांना दिले जात आहे, असेही ते म्हणाले.
प्रत्येक औषधाचा कोणता ना कोणता दुष्परिणाम जाणवतो. त्यामुळे टोसिलिजुमॅब या औषधामुळेसुद्धा बुरशीजन्य आजाराचा संसर्ग होऊ शकतो. कोविड प्रोटोकॉलनुसार या औषधाच्या डोसना कमी करण्यात आले आहे. खूप गरज असेल तरच या औषधाचा वापर करावा असे आवाहन सरकारकडून करण्यात येत आहे.
दिल्लीतील सर गंगाराम रुग्णालय, लेडी हार्डिंग वैद्यकीय महाविद्यालय, सफदरगंज आणि एम्ससह पाच रुग्णालयात आतापर्यंत एक डझन रुग्ण आढळले आहेत. या रुग्णांना कोरोनासह म्यूकोरमायकोसिस हा आजारही झालेला आहे. हा संसर्ग खूप वेगाने होत असून त्यामुळे डोळ्याची दृष्टी जाऊ शकते.