नवी दिल्ली – केंद्रीय राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) विज्ञान आणि तंत्रज्ञान; पृथ्वी विज्ञान, डॉ जितेंद्र सिंह यांनी भारतातील पहिल्या खारट पाण्यावर चालणाऱ्या दिव्यांचे अनावरण केले. LED दिवे चालवण्यासाठी इलेक्ट्रोड्समधील इलेक्ट्रोलाइटच्या स्वरुपात समुद्राच्या पाण्याचा वैशिष्टयपूर्ण रीतीने वापर करून हे दिवे निर्माण केले आहेत.
डॉ जितेंद्र सिंह यांनी तटवर्तीय संशोधन जहाज ‘सागर अन्वेशिका’ला दिलेल्या भेटीदरम्यान रोशनी या अतिशय वेगळ्या दिव्यांचे अनावरण केले. हे जहाज राष्ट्रीय महासागर तंत्रज्ञान संस्था (NIOT), चेन्नई द्वारे किनारी संशोधनासाठी संचालित आणि वापरले जाते. खारट पाण्याचे हे दिवे गरीब आणि गरजूंचे जीवन अधिक सुलभ करेल, विशेषतः भारताच्या ७५०० किलोमीटर लांब सागरी किनारपट्टीनजीक राहणाऱ्या कोळी समुदायाला त्याचा लाभ होईल , असे जितेंद्र सिंह म्हणाले.
रोशनी दिव्यांसह उर्जा मंत्रालयाच्या सौर अध्ययन दिव्यांसारख्या योजनांमुळे नवीकरणीय उर्जा निर्मिती कार्यक्रमाला एक चैतन्य मिळेल ज्यायोगे ऊर्जा सुरक्षा, सर्वांसाठी उर्जा आणि राष्ट्रीय अर्थव्यवस्थेतील कार्बन उत्सर्जनाचे प्रमाण कमी करण्याच्या उद्दिष्टांना हातभार लागेल, असे त्यांनी सांगितले. त्यानंतर डॉ जितेंद्र सिंह यांनी पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे सचिव डॉ. एम. रविचंद्रन यांच्यासह प्रयोगशाळांना भेट दिली आणि जहाजावर तिरंगा फडकवला. ‘हर घर तिरंगा’, ‘हर जहाज तिरंगा’ मोहिमेची व्याप्ती जहाजांपर्यंत वाढवत सिंह यांनी जहाजावर भारतीय ध्वज फडकावला. याशिवाय त्यांनी राष्ट्रीय महासागर तंत्रज्ञान संस्थेतील वरिष्ठ शास्त्रज्ञांची जहाजावर भेट घेतली आणि भारताच्या डीप ओशन मोहिमेच्या प्रगतीचा आढावा घेतला.
डॉ जितेंद्र सिंह यांनी समुद्राच्या पाण्याचे पिण्यायोग्य पाण्यात रूपांतर करण्यासाठी राष्ट्रीय महासागर तंत्रज्ञान संस्थेने (NIOT) विकसित केलेल्या लो टेम्परेचर थर्मल डिसेलिनेशन (LTTD) तंत्रज्ञानाच्या प्रगतीचाही आढावा घेतला, जे लक्षद्वीप बेटांवर यशस्वीरित्या स्थापित केले गेले आहे.या प्लांट्सच्या यशस्वी स्थापनेच्या आधारे, गृह मंत्रालयाने लक्षद्वीप या केंद्रशासित प्रदेशाच्या माध्यमातून 1.5 लाख लिटर प्रतिदिन क्षमतेचे आणखी 6 LTTD प्लांट स्थापन करण्याचे काम सोपवले आहे, अशी माहिती डॉ. एम. रविचंद्रन यांनी डॉ जितेंद्र सिंह यांना दिली.