नवी दिल्ली – केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्र, रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी एमएसएमईसाठी मानांकन प्रणाली आणि एमएसएमई योजनांच्या प्रभावी देखरेखीसाठी डॅशबोर्ड तयार करण्याचे आवाहन केले आहे. चेंबर ऑफ इंडियन एमएसएमई, सीआयएमएसएमई द्वारा आयोजित वेबिनारला संबोधित करताना ते म्हणाले की चांगली उलाढाल आणि जीएसटी संबंधित बाबींची उत्तम नोंद असलेल्या एमएसएमईंना मानांकन देण्यासाठी सोपी व पारदर्शक पद्धत विकसित केली पाहिजे, जेणेकरून बँका आणि संस्थांकडून वित्तपुरवठा मिळण्यासाठी त्या सक्षम बनतील. आता संपूर्ण जगाला भारतीय उद्योगात गुंतवणूक करायची आहे आणि प्रभावी मानांकन प्रणालीमुळे एमएसएमईंना परदेशातून चांगली गुंतवणूक मिळू शकते असे ते म्हणाले.
गडकरी यांनी निर्णय घेण्याबाबत होणारा विलंब टाळण्यासाठी योजनांच्या देखरेखीसाठी डॅशबोर्ड उभारण्याचा प्रस्ताव मांडला. त्यांनी सिडबीला तीन महिन्यांत निर्णय घेण्यास व मदत पुरवण्यास सांगितले. ते म्हणाले,आत्मनिर्भर भारताचे पंतप्रधानांचे स्वप्न साकारण्यासाठी एमएसएमईची महत्त्वपूर्ण भूमिका बजावू शकते .गडकरी म्हणाले, आपली प्रणाली पारदर्शक, कालबद्ध, निकालाभिमुख आणि कामगिरीभिमुख करण्याची आणि चांगल्या उद्योजकांना मदत करण्याची हीच वेळ आहे. विभक्तपणे काम न करता एकत्रितपणे काम करण्यावर त्यांनी भर दिला. गडकरी म्हणाले की कृषी, ग्रामीण आणि आदिवासी क्षेत्रात रोजगारनिर्मितीसाठी नवीन विचारसरणी, नवीन संकल्पना, नवीन तंत्रज्ञान व संशोधन करणे अत्यंत आवश्यक आहे.
देशाच्या जीडीपीमध्ये एमएसएमईचा वाटा सुमारे ३० टक्के आहे आणि ११ कोटीपेक्षा जास्त लोकांना ते रोजगार उपलब्ध करतात , जे संख्यात्मदृष्ट्या कृषी क्षेत्रानंतर दुसर्या क्रमांकाचे आहे असे ते म्हणाले