विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली
देशातील महत्त्वाच्या शिक्षण संस्थांपैकी एक असलेल्या आयआयटी दिल्लीने देशवासियांना मोठी खुषखबर दिली आहे. कोरोनाच्या लढ्यात सर्वसामान्यांना दिलासा देणारे कीटच आयआयटी दिल्लीच्या टीमने विकसित केले आहे. देशातील सर्वात स्वस्त आरटीपीसीआर चाचणी किट नंतर आता स्वस्त रॅपिड अॅन्टीजन टेस्ट (जलद प्रतिजैविक चाचणी) किट आले आहे. यामुळे अवघ्या ५० रुपयांमध्ये कोरोनाची चाचणी होऊ शकणार आहे.
तज्ज्ञांचा असा दावा आहे की, सदर चाचणी किट प्रारंभिक सीटी व्हॅल्यूजसाठी ९० टक्के संवेदनशील, १०० टक्के विशिष्टता आणि ९८.९९ टक्के अचूकतेसह उपयुक्त असल्याचे आढळले आहे. सदर चाचणी किट आयसीएमआरने प्रमाणित केली आहे. टेस्ट किटचे तंत्रज्ञान आणि उत्पादन १०० टक्के देशी आहे. केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री संजय धोत्रे यांनी या चाचणी किटचे शुभारंभ केला.
धोत्रे म्हणाले की, सदर तंत्रज्ञान देशातील कोविड चाचण्यांच्या उपलब्धतेत क्रांती आणेल. उपलब्ध अंतर्गत संसाधनांचा वापर करून किट पूर्णपणे आयआयटी दिल्ली येथे विकसित केले गेले आहे. देशातील विकसित तंत्रज्ञान व भारतात तयार केलेल्या उत्पादनांचा वापर करून देशातील साथीच्या रोगाचा सामना करण्यास स्वावलंबी होण्यास मदत केली.
आयआयटी दिल्लीचे संचालक प्रो. व्ही. रामगोपाल राव म्हणाले की, आयआयटी दिल्लीने यापुर्वी जुलै २०२० मध्ये ३९९ रुपयांची आरटीपीसीआर किट बाजारात आणली. यामुळे आरटीपीसीआर चाचणी खर्च कमी करण्यात मदत झाली. आतापर्यंत संस्थेने विकसित केलेल्या तंत्रज्ञानाचा वापर करून १० लाखाहून अधिक पीपीई किट पुरविण्यात आल्या आहेत.
आता अँटीजन आधारित वेगवान चाचणी किटचा उपयोग सुरू झाल्यामुळे आम्ही ग्रामीण भागासाठी कोरोना निदान सुलभ आणि स्वस्त बनवण्याची आशा आहे. बायोमेडिकल अभियांत्रिकी केंद्र, प्रोफेसर डॉ. हरपाल सिंग यांच्या नेतृत्वात आयआयटी दिल्लीच्या संशोधकांनी विकसित केले आहे. प्रो. हरपालसिंग म्हणाले की, सदर किट हे कोविड -१९ मध्ये सर्वसाधारण लोकांची तपासणी व निदान करण्यासाठी ते योग्य आहे.