मुंबई – बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने भारताच्या पूर्व किनारपट्टीला गुलाब चक्रीवादळाचा मोठा तडाखा बसला आहे. मात्र आता अरबी समुद्रात आणखी एक चक्रीवादळ येण्याची शक्यता असून पश्चिम किनारपट्टीवर मोठा धोका निर्माण होणार आहे. त्यामुळे मुंबईसह कोकण किनारपट्टीवरील नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या (आयएमडी) अधिकाऱ्यांनी सांगितले की, गुलाब चक्रीवादळ कमकुवत होऊन ते खोल समुद्राच्या दिशेने बदलू शकते. त्यातच या चक्रीवादळाने आंध्र प्रदेशात किनारपट्टीला जोरदार तडाखा दिला. त्याचवेळी, या आठवड्याच्या अखेरीस ते नवीन चक्रीवादळात रूपांतरित होऊ शकते. तसेच आज मंगळवारी ते कमी दाबाच्या क्षेत्रामध्ये अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, येत्या गुरुवारी ईशान्य अरबी समुद्र आणि गुजरात किनारपट्टीवर चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता आहे . याबाबत हवामान विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, सदर चक्रीवादळ हे शुक्रवारी तीव्र होण्याची शक्यता आहे. आयएमडीच्या चक्रीवादळाच्या प्रभारी सुनीता देवी यांनी स्पष्ट केले की, चक्रीवादळाची शक्यता कमी असली तरी, तरीही ते वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. कमी दाबाचे क्षेत्र मध्य भारताकडून पश्चिमेकडे सरकेल, त्यामुळे या प्रदेशात भरपूर पाऊस पडेल. हा कमी दाबाचा पट्टा महाराष्ट्र आणि गुजरात पार करत अरबी समुद्रात जाईल.
महासागर आणि वातावरणीय परिस्थिती अनुकूल असल्याने कमी दाबाची प्रणाली वेगाने तीव्र होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच चक्रीवादळ अरबी समुद्राच्या उत्तरेकडे जाईल. येत्या दोन ते तीन दिवसात पश्चिम किनारपट्टीवर वारे तीव्र होण्याची शक्यता आहे. परंतु सध्या त्याच्या सामान्य स्थितीच्या दक्षिणेकडे आहे आणि पुढील चार ते पाच दिवस ते कायम राहण्याची शक्यता आहे. त्यानंतर या आठवड्याच्या अखेरीस चक्रीवादळ पश्चिम किनारपट्टीवर अरबी समुद्रात सक्रिय होण्याची शक्यता आहे.