मुंबई – राज्यात शााळा आणि धार्मिक स्थळे सुरू करण्यास मान्यता दिल्यानंतर राज्य सरकारने आणखी एक निर्णय घेतला आहे. राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने आणि लसीकरणाला चांगला प्रतिसाद मिळत असल्याने महाविकास आघाडी सरकार राज्यातील निर्बंध शिथील करीत आहे. राज्यात ४ ऑक्टोबरपासून शाळा तर नवरात्रीच्या पहिल्या माळेपासून सर्व धार्मिक स्थळे सुरू होणार आहेत. आता २२ ऑक्टोबरपासून राज्यातील सर्व चित्रपटगृहे आणि नाट्यगृहे सुरू केली जाणार आहेत. अर्थात कोरोनाशी निगडीत विविध प्रकारच्या नियमावलींचे पालन बंधनकारक असणार आहे. ज्या व्यक्तींनी कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत. त्यांना चित्रपट आणि नाट्यगृहात प्रवेशाला प्राधान्य असणार आहे. चित्रपट गृहे आणि नाट्य गृहे सुरू करण्याबाबत निर्णय झाला असून त्यासंबंधीची नियमावली (एसओपी) तयार करण्याविषयी सध्या काम सुरू आहे. ही नियमावली लवकरच जाहिर केली जाणार आहे. तशी माहिती मुख्यमंत्री कार्यालयाच्यावतीने देण्यात आली आहे.
राज्यातील चित्रपटगृहे आणि नाट्यगृहे २२ ऑक्टोबरनंतर आरोग्याचे नियम पाळून खुली करण्यास परवानगी देण्यात येईल असे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी घोषित केले आहे. यासंदर्भात सविस्तर कार्य पद्धती एसओपी तयार करण्याचे काम सुरू असून ती लवकरच जाहीर करण्यात येईल.
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) September 25, 2021