अश्विनी कावळे, इंडिया दर्पण वृत्तसेवा
प्रादेशिक भाषांमध्ये इंजिनीअरिंगचा अभ्यास सुरू केल्यानंतर आता वैद्यकीय शिक्षणही इंग्रजीसह प्रादेशिक भाषांमध्ये उपलब्ध करुन देण्याचा विचार केला जात आहे. नॅशनल मेडिकल कमिशनच्या (एनएमसी) नुकत्याच झालेल्या बैठकीत यावर चर्चा झाली आहे. या बैठकीत तयार करण्यात आलेला चर्चेचा मसुदा विविध पक्षांची मते जाणून घेण्यासाठी प्रसिद्ध करण्यात आला आहे. म्हणजेच, येत्या काळात मराठी भाषेतही विद्यार्थ्यांना वैद्यकीय शिक्षण घेता येईल.
नॅशनल मेडिकल कमिशनच्या स्थापनेपूर्वी अटलबिहारी वाजपेयी विद्यापीठाने हिंदीतून वैद्यकीय अभ्यासक्रम सुरू करण्याचा प्रस्ताव फेटाळून लावला होता. मात्र, आता या मुद्यावर नव्या पद्धतीने विचार सुरू आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वैद्यकीय शिक्षण दोन भाषांमध्ये सुरू करण्याचा नवा प्रस्ताव या बैठकीत सादर करण्यात आला आहे. हा प्रस्ताव सध्या चर्चेत असून त्यावर लवकरच निर्णय घेतला जाईल. वैद्यकीय शिक्षण इंग्रजीसह स्थानिक भाषेत सुरू झाले तर, देशाच्या वेगवेगळ्या भागात ते भाषेच्या बाजूने वेगवेगळे असू शकते. उदाहरणार्थ, महाराष्ट्रात इंग्रजीसह मराठी, उत्तर प्रदेशमध्ये इंग्रजीसह हिंदी आणि तमिळनाडूमध्ये इंग्रजीसह तमिळ भाषा याप्रमाणे त्याची आखणी केली जाऊ शकते. यामुळे विद्यार्थ्यांना वैद्यकीय शिक्षणाचा राज्यस्तरावर अभ्यास करणे सोयीचे होणार आहे. तसेच ग्रामीण वातावरणातून येणाऱ्या विद्यार्थ्यांना वैद्यकीय शिक्षण पूर्णतः इंग्रजीमध्ये घेणे सुरुवातीच्या काळात कठीण जात असल्याचे निदर्शनास आले आहे. या निर्णयामुळे त्यांच्या शिक्षणाला तसेच प्रादेशिक भाषांनाही प्रोत्साहन मिळेल.
काही काळापूर्वी AICTE ने हिंदीसह इतर प्रादेशिक भाषांमध्ये इंजिनीअरिंग अभ्यास सुरू करण्याची घोषणा केली होती. अनेक इंजीनिअरिंग महाविद्यालयांनीही या सत्रापासून ते सुरूदेखील केले आहे. दोन भाषांमध्ये वैद्यकीय अभ्यास सुरू करण्याच्या प्रस्तावावर नॅशनल मेडिकल कमिशनला किती यश मिळेल हे प्रतिसादावर अवलंबून असेल. मात्र, या प्रस्तावाला फारसा विरोध होण्याची शक्यता नाही, कारण त्यात इंग्रजी ही मुख्य भाषा असेल.