नवी दिल्ली – जागतिक आरोग्य संघटने(डब्ल्यूएचओ) ने जगातील पहिली मलेरियावरील लस मुलांना देण्याची शिफारस केली आहे. ही लस म्हणजे विज्ञान, मुलांचे आरोग्य आणि मलेरिया नियंत्रणासाठी मोठे यश असल्याचे डब्ल्यूएचओने म्हटले आहे. घाना, केनिया आणि मालावीमध्ये २०१९ मध्ये सुरू झालेल्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या निष्कर्षानंतर RTS, S/AS01 या मलेरिया लशीची शिफारस करण्यात आली आहे.
मलेरियाला रोखण्याच्या सध्याच्या उपाययोजनांसह या लशीच्या वापरामुळे दरवर्षी हजारो मुलांचे आयुष्य वाचवता येईल, असे डब्ल्यूएचओचे महासंचालक टेड्रोस अधानोम यांनी पत्रकार परिषदेत म्हटले आहे. ही लस म्हणजे शक्तीशाली हत्यार आहे. परंतु कोविड लशीसारखा हा एकमात्र उपाय नाही.
मलेरियाला रोखण्यासाठी मच्छरदाणी किंवा ताप रोखण्यासाठीच्या उपाययोजना तेवढ्याच आवश्यक आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले. मलेरियासंदर्भात संशोधनाच्या सुरुवातीच्या दिवसांबद्दल आठवणी सांगताना टेड्रोस म्हणाले, की जगातील या प्राचीन आणि भयानक आजाराविरुद्ध एक प्रभावी लस उपलब्ध होईल यासाठी आम्ही वाट पाहात होतो. आज तो ऐतिहासिक दिवस आलेला आहे.
एनोफिलिज या मादा डासांच्या चावण्यामुळे मलेरिया होतो. डास चावल्यानंतर रुग्णाला ताप, थंडी, सर्दीसारखे लक्षणे दिसू लागतात. योग्य उपचार मिळाले नाही, तर रुग्णाची तब्येत बिघडू शकते किंवा व्यक्तीचा जीवही जाऊ शकतो. यूएनच्या एका एजन्सीच्या माहितीनुसार, पाच वर्षांहून कमी वयाची मुले मलेरियाने अधिक बाधित होतात. मलेरियाविरुद्ध गेल्या दोन दशकात जगात खूपच प्रगती झाली आहे. परंतु अजूनही दरवर्षी वीस कोटी नागरिक बाधित होतात. त्यापैकी ४ लाख रुग्णांचा मृत्यू होतो.