अश्विनी कावळे, इंडिया दर्पण वृत्तसेवा
कोरोना विषाणू अजूनही पूर्णपणे संपलेला नाही. असे असताना एका नव्याच आजाराने डोके वर काढले आहे. लासा ताप असे या आजाराचे नाव आहे. ब्रिटनमध्ये लासा तापाने झालेल्या मृत्यूने चिंता वाढवली आहे. ब्रिटिश आरोग्य अधिकाऱ्यांनी विषाणूच्या तीन प्रकरणांचा अभ्यास केला असून, या आजाराने ब्रिटनमध्ये झालेल्या रुग्णांच्या मृत्यूनंतर त्यांच्या संपर्कात आलेल्या लोकांचा शोध घेतला जात आहे. यूके हेल्थ सिक्युरिटी एजन्सी (UKHSA) ने म्हटले आहे की त्याचा धोका सर्वसामान्यांसाठी खूपच कमी आहे. कोरोना विषाणूप्रमाणेच लासा विषाणू देखील प्राण्यापासून माणसात संक्रमित होणार आहे. हा उंदरांमुळे पसरत असल्याचे सांगण्यात येत आहे.
जागतिक आरोग्य संघटनेच्या मते, लासा ताप हा एक तीव्र रक्तस्रावी रोग आहे. उत्तर नायजेरियातील एका शहराच्या नावावरून या विषाणूला लासा असे नाव देण्यात आले आहे. १९६९मध्ये पहिल्यांदा तिथे हा प्रकार सापडला होता. २००९नंतर त्याची प्रकरणे पुन्हा आता सापडायला लागले आहेत. हा विषाणू उंदरांमुळे पसरतो. लाइव्ह मिंटच्या रिपोर्टनुसार, जर उंदराची विष्ठा, आपल्या खाण्यापिण्यापर्यंत पोहोचली आणि ते शिवले माणसाकडून शिवले गेले तर संसर्ग होऊ शकतो. हा विषाणू माणसापर्यंत पोहोचण्याचे मुख्य कारण म्हणजे खाणेपिणेच आहे. ज्या घरांमध्ये उंदीर आहेत, त्यांना या आजाराची शक्यता जास्त असते.
अहवालानुसार, लासा व्हायरसने संक्रमित ८० टक्के लोकांमध्ये लक्षणे दिसत नाहीत. २० टक्के लोकांमध्ये हिरड्या, नाक, डोळे किंवा इतरत्र रक्तस्राव होऊ शकतो. श्वास घेण्यास त्रास होणे, खोकला, उलट्या आणि जुलाब ही देखील त्याची लक्षणे आहेत. याशिवाय गिळताना त्रास होणे, चेहऱ्यावर सूज येणे, छातीत दुखणे, पोटदुखी हीदेखील या आजाराची लक्षणे आहेत. ५ पैकी १ रुग्ण गंभीर स्थितीत असू शकतो. जागतिक आरोग्य संघटनेच्या मते, या आजाराचा मृत्यू दर १ टक्का आहे.