इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – गेल्या दोन वर्षांपासून जगभरात सगळेच कोरोना संसर्गाचा सामना करत आहेत. अनेकांना या संसर्गाची लागण झाली. अजूनही कोरोना संपलेला नसून, या संसर्गाने आव्हान कायमच आहे. मात्र, आता कोरोना टेस्ट, औषधोपचार यांमध्ये पूर्वीपेक्षा अधिक सहजता आलेली दिसते. वेगवेगळे संशोधने या आजारावर अद्याप जगभर सुरूच आहेत. या संशोधनांतून नवीनच माहिती समोर आली आहे. ती म्हणजे की आता कुत्रेही माणसाला संसर्ग झाला आहे की नाही, हे ओळखू शकणार आहेत.
कोरोना संसर्गाची लागण कोणाला झाली आहे की नाही, हे तपासण्यासाठी आरटीपीसीआर टेस्ट केली जाते. पण आता कोरोना झाला आहे की नाही, हे ओळखण्यासाठी एक विचित्रच पद्धत समोर आली आहे. फ्रेंच संशोधकांनी एका संशोधनातून हा निष्कर्ष समोर आणला आहे. त्यांनी म्हणले आहे की, ज्या व्यक्तींच्या शरीरात दीड वर्षांपासून अधिक काळ व्हायरस असेल, त्यांना प्रशिक्षित कुत्रे ओळखू शकणार आहेत. या संसर्गाला ओळखण्यात कुत्र्यांना त्यांनी प्रभावी मानले आहे.
इतके वर्ष आपण ऐकत आलो आहोत की, एखाद्या चोराला पकडण्यासाठी किंवा कुठे बॉम्बसदृश घटक असतील तर ते शोधण्यासाठी कुत्र्यांची मदत होते. त्यामुळेच तर पोलिस शोधकार्यासाठी निघताना आपल्यासोबत कुत्र्यांनाही ठेवतात. २०२०मध्ये सार्स या व्हायरसची लागण झाली आहे की नाही, हे तपासण्यासाठीही संशोधकांनी कुत्र्यांना प्रशिक्षण दिले होते.
कुत्र्यांमध्ये वास घेऊन एखादा पदार्थ, घटक ओळखण्याची क्षमता सर्वात जास्त असते. जेव्हा मनुष्याचा श्वासोच्छवास सुरू असतो तेव्हा तो कार्बनडाय ऑक्साईड बाहेर सोडतो, त्याचे रुपांतर गॅस स्वरुपात होते. एक विशिष्ट गंध याला येत असतो. या गंधामुळे कुत्र्यांना आजार ओळखता येतो, असे या संशोधनातून पुढे आले आहे. त्यामुळेच जगभरात या वर्षात जे – जे मोठे कार्यक्रम होणार असतील तिथे या कुत्र्यांच्या पथकांची नेमणूक केली जाणार आहे. दुबई, अमेरिकासारख्या देशांनी तर ही तयारीपण सुरू केली आहे. त्यामुळे त्याची सध्या जगभरात चर्चा सुरू आहे.