मुंबई – देशात इंधनदरवाढीचा आलेख चढाच असून शंभरी पार केलेल्या पेट्रोल आणि डिझेलच्या दरांनी सर्वासामान्यांच्या तोंडाला फेस येऊ लागला आहे. कारण आज पेट्रोल २९ पैशांनी वाढून १०९.८३ रुपयांवर, तर डिझेल ३७ पैशांनी वाढून १००.२९ रुपये प्रतिलिटरवर पोहोचले आहे. एकामागून एक दरांचे विक्रम मोडणारा भस्मासूर वाढतच आहे. त्याच्या जोडीला महागाईरूपी राक्षसही आ वासून उभा आहेच. इंधनदरवाढ अन् महागाईरूपी राक्षसाला रोखणारा कोणीच वाली नाही का, असा प्रश्न सर्वसामान्यांना पडत आहे.
देशातील २६ राज्यांमध्ये पेट्रोल-डिझेलचे दर शंभर रुपयांच्या वर पोहोचले आहेत. जगात कच्चा तेलाची मागणी वाढली आहे. उत्पादन कमी होत असल्याने त्याचा परिणाम इंधनांच्या दरांवर झाला आहे. काही दिवसांपूर्वी ओपेक देशांच्या बैठकीत दररोज ४ लाख बॅरल कच्च्या तेलाचे उत्पादन वाढविण्याची मागणी करण्यात आली होती. त्यामुळे इंधनाचे दर वाढत आहेत. इंधनदरवाढ झाल्यामुळे आपोआपच इतर वस्तूंच्या किमती वाढत आहेत. महागाईने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे.
देशातील प्रमुख शहरातील दर
शहर – पेट्रोल – डिझेल = (रुपये प्रति लिटर)
दिल्ली १०३.८४ ९२.४७
मुंबई १०९.८३ १००.२९
कोलकाता १०४.५२ ९५.५८
चेन्नई १०१.२७ ९६.९३