अश्विनी कावळे, इंडिया दर्पण वृत्तसेवा
कोरोना संकटकाळात ऑनलाइन आणि डिजिटल शिक्षण ही काळाची गरज म्हणून स्वीकारण्यात आले होते. पण आता हे माध्यम विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याचे माध्यम बनले आहे. त्याचमुळे केंद्र सरकार आता विद्यार्थ्यांसाठी टीव्हीवर शिक्षण देण्याचा विचार करत आहे. सर्व भाषांमधील शैक्षणिक चॅनेल्स याअंतर्गत सुरू होणार असून विद्यार्थ्यांना घरबसल्या शिक्षण मिळणार आहे. येत्या दोन ते तीन महिन्यात जवळपास अशी शंभर चॅनेल्स सुरू करण्यात येणार आहेत.
ऑनलाइन शिक्षणाचे महत्त्व जाणून घेत केंद्रीय अर्थसंकल्पात या शैक्षणिक चॅनेल्सविषयी घोषणा करण्यात आली होती. शैक्षणिक चॅनेल्सबरोबरच असेही काही चॅनेल्स असणार आहेत, ज्याद्वारे केवळ व्यावसायिक शिक्षण दिले जाईल. हे चॅनेल्स सुरू करण्याबाबत योजना आखण्यात आली आहे. त्यापैकी सुमारे शंभर टीव्ही चॅनेल्स केवळ शालेय शिक्षणासाठी असतील. त्याचप्रमाणे उच्च शिक्षणासाठी सुमारे ५० चॅनेल्स सुरू करण्यात येणार आहेत, तर व्यावसायिक शिक्षण आणि तांत्रिक शिक्षणासाठीही काही समर्पित वाहिन्या सुरू करण्याची योजना आहे.
शिक्षण मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, सध्या पीएम – ईविद्या योजनेंतर्गत १२ टीव्ही चॅनेल चालवले जात आहेत. इयत्ता पहिली ते बारावीसाठी प्रत्येकी एक समर्पित चॅनेल आहे. सध्या सुरू होणाऱ्या चॅनेल्सलही यापूर्वीच सुरू करण्याचा मानस होता. पण आशय तयार होण्यास उशीर झाल्यामुळे आता या चॅनेल्सची घोषणा करण्यात आली आहे. हा मजकूर विविध भाषांमध्ये अनुवादित करून प्रक्षेपित करण्याची तयारी सुरू आहे. डिजिटल शिक्षा ही सध्याच्या काळाची गरज आहे. बहुतेक शाळांमध्ये गणित, विज्ञानासह इतर विषयांना शिक्षक नसल्याची माहिती अनेकदा समोर येते. आता तिथल्या विद्यार्थ्यांनाही गुणवत्तापूर्ण शिक्षण घेता येईल, असे सांगण्यात आले आहे. तसेच ग्रामीण, दुर्गम भागांतील विद्यार्थ्यांसाठी तर ही योजना अतिशय महत्त्वाची ठरेल, असा विश्वासही व्यक्त केला जात आहे.