मनीष कुलकर्णी, इंडिया दर्पण वृत्तसेवा
देशात श्रीमंतांच्या मालमत्तेत वेगाने वाढ झालेली असताना गरिब आणखी गरिब झाले आहेत. राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय (एनएसओ) तर्फे जारी करण्यात आलेल्या २०१८ सालच्या आकडेवारीनुसार २०१२ ते २०१८ दरम्यान श्रीमंत आणि गरिब नागरिकांच्या मालमत्तेत घट झाली आहे. परंतु विविध माध्यमांच्या सार्वजनिक आकडेवारीद्वारे याची तुलना केली तर या कालावधीत श्रीमंतांची मालमत्ता जवळपास दुपटीने वाढली आहे. तर गरिबांची आर्थिक परिस्थिती आणखी हलाखीची झाली आहे. जगातील इतर देशांच्या तुलनेत भारतीय श्रीमंतांकडे जास्त पैसा आहे.
सर्वेक्षणात समोर आलेल्या माहितीनुसार, बहुतांश भारतीयांनी २०१२ पासून २०१८ दरम्यान सोन्यामध्ये गुंतवणूक केली आहे. या वर्षांमध्ये सोन्याच्या दरात घट झाली आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांचे नुकसान झाले आहे. तर श्रीमंतांनी शेअर्समधून मालमत्ता मिळवली आहे. या कालावधीत शेअर बाजार जवळपास तीन पटीने वाढला आहे. या कालावधीत श्रीमंतांची मालमत्ता दुपटीहून अधिक वाढ झाली आहे. सर्वेक्षणात हे आश्चर्यचकित करणारे तथ्य असल्याचे म्हटले आहे.
सर्वेक्षणानुसार, भारतातील ०.००१ टक्के अतिश्रीमंत नागरिकांची मालमत्ता अमेरिका आणि चीनसारख्या जगातील सर्वात मोठ्या अर्थव्यवस्था असलेल्या देशांच्या तुलनेत अधिक आहे.
भारतातील या श्रीमंतांची सरासरी मालमत्ता फक्त रशियापेक्षा कमी आहे. रशियामध्ये एकूण १५ टक्क्यांहून अधिक पैसा आहे. भारतात या श्रीमंताजवळ देशाच्या एकूण पैशांच्या नऊ टक्क्यांच्या आसपास पैसा आहे.
सर्वेक्षणात आर्थिक असमानतेचे खूपच आश्चर्यचकित करणारी आकडेवारी समोर आली आहे. श्रीमंतांच्या मालमत्तेच्या प्रकरणांमध्ये जर १९९० नंतर महागाई सरासरी १० टक्के मानले गेले, तर गरिबांची परिस्थिती त्याहून हलाखीची झाली आहे. अधिकृत आकडेवारीमध्ये श्रीमंतांच्या मालमत्तेत घट दर्शविण्यात आली आहे. परंतु वास्तविक आकलन केले तर परिस्थिती यापेक्षा उलट आहे.
अधिकृत आकडेवारीनुसार, २०१८ मध्ये भारतात ०.००१ टक्के अतिश्रीमंतांकडे देशाच्या एकूण मालमत्तेच्या फक्त ०.३४ टक्के धन होते. परंतु वास्तवात यांच्याकडे देशाच्या एकूण पैशांच्या ९.२ टक्के पैसा आहे. देशातील सात हजार धनवान नागरिकांजवळ ३५ कोटी अतिगरिब नागरिकांहून अधिक मालमत्ता आहे.
अधिकृत आकडेवारीनुसार, देशातील सर्वाधिक धनवान व्यक्तीची मालमत्ता २४.४ कोटी रुपये सांगण्यात आली आहे. तर सार्वजनिक आकडेवारीनुसार देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांची मालमत्ता २०१८ मध्ये २.५ लाख कोटी रुपये होती.