नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – देशाच्या विविध भागात कोरोना हातपाय पसरत असल्याने केंद्र सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आता देशातील 5 ते 12 या वर्षे वयोगटातील बालकांना कोरोना प्रतिबंधक लस दिली जाणार आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. मनसुख मांडविय यांनी तशी माहिती दिली आहे.
देशातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता अनेक शहरांमध्ये पुन्हा निर्बंधांवर जोर देण्यात येत आहे. त्यातच आता केंद्र सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. 12 वर्षांपेक्षा लहान मुलांच्या लसीकरणाला ग्रीन सिग्नल दिला आहे. 5 ते 12 वर्षे वयोगटातील मुलांना Corbevax लस मिळेल आणि 6 ते 12 वर्षे वयोगटातील मुलांना Covaxin लस मिळेल. यासाठी आपत्कालीन वापरास मान्यता देण्यात आली आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी ट्विट करून ही माहिती दिली असून, कोरोनाविरुद्धचा लढा आणखी मजबूत करण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. या वयोगटातील मुलांसाठी दोन लसी निवडण्यात आल्या आहेत. यासोबतच 12 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मुलांसाठी ‘ZyCoV-D’ ची 2 डोस लस देखील मंजूर करण्यात आली आहे.
मात्र, हे लसीकरण कधी आणि कुठे सुरू होईल, हे स्पष्ट करण्यात आलेले नाही. पण लवकरच याबाबतची माहितीही समोर येईल असं सांगण्यात येत आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, लहान मुलांच्या लसीकरणाबाबत लवकरच निर्णय घेतला जाण्याची अपेक्षा होती. आताच्या टप्प्यात DCGI ने या वयोगटातील मुलांचे लसीकरण मंजूर केले आहे.
https://twitter.com/mansukhmandviya/status/1518863947386224641?s=20&t=fP_EfCiBXK2RfBienWZBXA
दुसरीकडे, देशातील अनेक भागांमध्ये कोरोनाचा धोका वाढला आहे. अलीकडेच, सरकारने दिल्ली, यूपी, हरियाणा आणि मिझोरामला कोरोनाच्या वाढत्या प्रकरणांबाबत अलर्ट पाठवला होता. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने पाठवलेल्या अलर्टमध्ये असे म्हटले आहे की, गेल्या काही दिवसांत या राज्यांमध्ये कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढली आहेत. अशा परिस्थितीत कोरोनाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक आहे.
तज्ज्ञांचे मत आहे की, नागरिक बेफिकीर राहायला लागल्याने कोरोना बधित वाढत आहेत. लोक आता सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर कमी करत आहेत. अलीकडेच, कोरोनाच्या प्रकरणांमध्ये वाढ दर्शविल्यानंतर, दिल्ली सरकारने पुन्हा एकदा मास्क घालणे अनिवार्य केले आहे आणि उल्लंघन करणार्यांवर पाचशे रुपये दंड ठोठावण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सर्व मुख्यमंत्र्यांसह आरोग्य आणि अन्य महत्त्वाच्या अधिकाऱ्यांसोबत उद्या कोरोना आढावा बैठक घेणार आहेत.