विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली
देशभरातील कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे. सद्यस्थितीत पाच दिवसांचा आठवडा या नियमाप्रमाणे काम सुरू आहे. परंतु कर्मचाऱ्यांना आता आठवड्यातून ४ दिवस काम आणि ३ दिवसांची सुटी असा नियम होणार आहे. केंद्र सरकार लवकरच कामगार कायद्यातील बदल अंमलात आणणार असून, त्याची तयारी सुरू झाली आहे. नव्या कामगार कायद्यानुसार कर्मचाऱ्यांच्या कामाचे तास आणि दिवस कमी होण्याची शक्यता आहे.
मनी कंट्रोलने दिलेल्या वृत्तानुसार, या बदलानुसार कर्मचाऱ्यांचा कामाचा वेळ १२ तासांपर्यंत वाढविण्याचा निर्णय झाला आहे. याबाबत कंपनी आणि कर्मचारी समन्वयातून निर्णय घेणार आहेत. नव्या नियमानुसार कर्मचारी ४८ तास काम करणार आहेत. बारा तास काम करण्याच्या प्रस्तावात १५ ते ३० मिनिटे अधिक काम केल्यास त्याचा ओव्हरटाइम गणला जाणार आहे. नव्या कायद्याच्या मसुद्यात कोणत्याही कर्मचाऱ्याकडून सलग पाच तास काम करून घेऊ शकत नाही. पाच तासांमध्ये अर्धा तासाचा ब्रेक मिळणार आहे. कर्मचाऱ्यांच्या एकूण पगारात बेसिक पगार ५० टक्क्यांहून अधिक असायला हवा. आता पगाराच्या रचनेत बदल होणार आहे. कर्मचाऱ्यांच्या हातात कमी पगार मिळणार असून पीएफची रक्कम वाढणार आहे.