मुंबई – सणासुदीच्या पार्श्वभूमीवर जवळपास एका महिन्यानंतर शेअर बाजारात पुन्हा चैतन्य निर्माण झाले आहे. कारण नोव्हेंबरच्या पहिल्या पंधरवाड्यात पेटीएमची मूळ कंपनी वन ९७ कम्युनिकेशन्स आणि पॉलिसी बाझारची मूळ कंपनी पीबी फिनटेक यांच्यासह पाच कंपन्या आयपीओ म्हणजेच शेअर्स विक्री करत आहेत. या आयपीओतून २७ हजार कोटी रुपयांहून अधिक पैसे मिळणार आहेत.
आयपीओ काढणार्या इतर कंपन्यांमध्ये केएफसी आणि पिझ्झा हटचे व्यवस्थापन पाहणारी सफायर फूड्स इंडिया, एसजेएस एंटरप्रायझ आणि सिगाची इंडस्ट्रीज यांचा समावेश आहे. नायका या सौंदर्य प्रसाधन उत्पादनांचे व्यवस्थापन सांभाळणार्या एफएसएन ई कॉमर्स व्हेंचर्च लिमिटेडचे आणि फिनो पेमेंट्स बँकेचे आयपीओ खुले झाले आहेत.
नायका (Nykaa IPO) चा आयपीओ एक नोव्हेंबर आणि फिनो पेमेंट्स बँकचा आयपीओ दोन नोव्हेंबरला बंद होईल. नायकाच्या आयपीओतून ५,३५२ कोटी रुपये आणि फिनो पेमेंट्स बँकेचा १,२०० कोटी रुपये मिळण्याची शक्यता आहे. एकूणच या सातही कंपन्यांचे आयपीओतून ३३,५०० कोटी रुपये मिळण्याची शक्यता आहे. तत्पूर्वी २९ सप्टेंबर रोजी आदित्य बिर्ला एएमसी कंपनीचा २,७७८ कोटी रुपयांचे आयपीओ खुला झाला होता.
शेअर बाजारात आयपीओ खुल्या करणार्या कंपन्यांना आपल्या व्यवसायावर चांगला प्रीमिअम आणि मूल्यांकन मिळण्याची आशा असते. विशेषतः तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांना चांगला प्रीमिअम मिळत आहे. २०२१ मध्ये आतापर्यंत ४१ कंपन्यांच्या आयपीओमधून ६६,९१५ कोटी रुपये मिळाले आहेत.