नवी दिल्ली – रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालय व भारतीय राष्ट्रीय राजमार्ग तर्फे पूल बांधणीतील उल्लेखनीय कार्याबद्दल नाशिकचे प्रकल्प संचालक भाऊसाहेब शंकर साळुंके तसेच कत्रांटदार अंकित अग्रवाल, संचालक, मे. दिनेशचंद्र आर. अग्रवाल इंन्फ्राकॅान प्रायवेट लिमिटेड यांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. हा सत्कार लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, लोकसभा अध्यक्ष, केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी, राज्यमंत्री वी.के. सिंग यांच्या हस्ते झाला.
रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालय व भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण यांच्यामार्फत रस्ते व पूल बांधणीतील उल्लेखनीय कार्याबद्दल काही निवडक अधिका-यांचा सन्मान नवी दिल्ली येथे २८ जून रोजी करण्यात आलेला आहे. त्यात नाशिक शहरातून जाणा-या राष्ट्रीय महामार्ग क्र. ३ वरील जत्रा हॅाटेल ते के. के. वाघ कॅालेज दरम्यान बांधण्यात आलेल्या सलग ३.५० कि.मी. इलेव्हेटेड कॅारिडॅार (प्लाय ओव्हर) ची दखल घेण्यात आली. मुंबई- आग्रा (रा. म. क्र. ३) नाशिक शहराला दोन भागांमध्ये विभाजित करतो आणि त्यातून निर्माण होणा-या वाहतुक कोंडी आणि अपघात निर्मूलनासाठी हा प्रकल्प हाती घेण्यात आला होता. या विभागासाठी इलेव्हेटेड सेगमेंटल कॅारिडॅार बांधण्याचा निर्णय घेण्यात आला. हे काम ऑक्टोबर, २०१८ मध्ये सुरू झाले आणि सप्टेंबर, २०२१ पूर्ण झाले.
महामार्गावरील जड आणि शहरी रहदारीसह अधिक जटील बनलेल्या व उपलब्ध जागेमध्ये कॅारिडॅारचे काम करणे हे एक कठीण आव्हान होते, त्यातच पाण्याच्या लाईन देखील होत्या. कॅारिडॅारची लांबी ३.५ कि.मी. असून त्यामध्ये दोन-ं दोन रॅम्प आहेत व ‘डेक कंटिन्युटी’ तत्वावर आधारित आहे. अपघात प्रवण के. के. वाघ कॅालेज, बळी मंदिर, अमृतधाम आणि जत्रा हॅाटेल इ. चैकात होणारी वाहतूक कोंडी या प्रकल्पामुळे इतिहास जमा -झाली आहे. तसेच नाशिकच्या एका टोकापासून दुस-या टोकापर्यत फक्त १२ मिनीटांत सुखकर आणि सुरक्षित प्रवासाचा अनुभव नागरीक घेऊ शकत आहेत. यामुळेच परीसराच्या सर्वांगीण विकासाला चालना आणि रोजगार निर्मितीला गती मिळणार आहे. या महत्वपूर्ण कामाची दखल घेत अधिका-यांचे व कत्रांटदाराचा सन्मान करण्यात आला.
सदर प्रकल्प पूर्णत्वास नेण्याकरीता भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण नाशिकचे व्यवस्थापक (तांत्रिक) दिलीप रामराव पाटील, कत्रांटदाराचे प्रकल्प व्यवस्थापक धनंजय जाधव व सल्लागार मे. टी. पी. एफ. इंजिनियरींग प्रायवेट लिमिटेड यांचे मोलाचे योगदान लाभले.