मुंबई – सुमारे दोन वर्षांपासून कोरोना महामारीने जगभरातील बहुतांश देशांमध्ये हाहाकार उडवला आहे. त्यामुळे संपूर्ण मानव जातीमध्ये भीतीचे वातावरण आहे. मात्र अशा परिस्थितीतही जगातील सुमारे बारा देशांमध्ये या कोरोनाने शिरकाव केलेला नाही. हे ऐकून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. पण, हे खरे आहे. या बाबीचे शास्त्रज्ञांना आश्चर्य आणि समाधानही वाटते आहे.
जगभरात श्रीमंत आणि गरीब देश कोरोना महामारीचा सामना करत आहेत. आतापर्यंत जगभरात २७ कोटींहून अधिक नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे, तर ५३ लाखांहून अधिक व्यक्तींनी आपला जीव गमावला आहे. त्याचवेळी सुमारे १२ देश असे आहेत की, तेथे कोरोनाने अद्यापही आपले पाय पसरलेले नाहीत. या देशांनी कोरोनाच्या महामारीपासून स्वतःला सुरक्षित कसे ठेवले हे मोठे कोडेच आहे.
कोरोना मुक्त असलेले हे १२ देश सध्या जगभरात कौतुक आणि चर्चेचा विषय बनले आहेत. यातील १० देश हे बेटावरील असून त्यांची लोकसंख्या खूपच कमी आहे. त्याचवेळी, दोन देश असे आहेत की, तेथे हुकूमशाही व्यवस्था आहे. त्यामुळे त्यांनी आपली सीमा कठोरपणे बंद केली आहे. सहाजिकच या देशांना कोरोना रोखण्यात यश आले असल्याचे सांगण्यात येत आहे. या देशांमध्ये कोरोनाची शून्य प्रकरणे नोंदवली जात आहेत. परंतु काही देशात यापुर्वी विषाणू प्रकरणे आली असावीत, हे नाकारता येत नाही असेही बोलले जात आहे. कारण उत्तर कोरिया आणि तुर्कमेनिस्तान सारखे देश त्यांच्याकडील आरोग्याची आकडेवारी अचूकतेने आंतरराष्ट्रीय गटांसोबत शेअर करत नाहीत. त्यामुळे त्या संदर्भात अचूक सांगता येणार नाही, असाही मतप्रवाह आहे. पण हे १२ देश कोणते त्याविषयी आपण जाणून घेऊया…
कुक बेटे
हा १५ द्वीपसमूहाचा देश दक्षिण पॅसिफिकमध्ये स्थित असून न्यूझीलंडपासून ३२०० किमी दूर आहे. कुक बेटांवर येणाऱ्या परदेशींसाठी अलग ठेवणे अनिवार्य केले आहे. क्रूझ जहाजांसह इतर नौका येण्यावरही तात्पुरती बंदी घालण्यात आली आहे.
मायक्रोनेशिया
मायक्रोनेशिया हा देश ६०० पेक्षा जास्त बेटांनी बनलेला आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणण्यानुसार, येथे कोरोनाचा एकही केस आलेला नाही. अमेरिका, चीन आणि जपानने देखील कोरोनाव्हायरस साथीच्या आजाराच्या वेळी मायक्रोनेशियाला मदत केली.
किरिबाटी
सुमारे ३२ प्रवाळ बेटे तसेच गोलाकार कोरल रीफ आणि चुनखडीची बेटे मिळून किरिबाटी हा एक देश बनला आहे. हवाई बेटांपासून तो ३२०० किमी अंतरावर आहे. परदेशी प्रवाशांना प्रवास निर्बंध लादणाऱ्या सर्वात आधीच्या देशांपैकी किरिबाटी हा एक देश होता. यामुळे काही मोजक्याच विमान कंपन्या या दुर्गम देशात प्रवास करतात.
नौरू
नौरू आकाराने जगातील तिसरा सर्वात लहान देश आहे. कारण तो फक्त आठ चौरस मैलांच्या क्षेत्रात असून त्याची लोकसंख्या दहा हजारांच्या आसपास आहे. नौरूने आतापर्यंत त्याच्या शेजारील बेट किरिबाटीसारख्या देशाप्रमाणे प्रवासी निर्बंधांद्वारे कोरोना विषाणूवर मात केली आहे.
नियू
नियू बेट हे बेट न्यूझीलंडपासून २४०० किमी अंतरावर आहे. नियू हे बेट असलेले राष्ट्र जगातील सर्वात मोठ्या प्रवाळ बेटांपैकी एक आहे. यांच्याकडून न्यूझीलंडला कोरोना महामारीचा सामना करण्यासाठी सतत मदत मिळत आहे.
उत्तर कोरिया
उत्तर कोरिया हा देश चीन आणि दक्षिण कोरियाशी आपली सीमा सामायिक करतो. त्यामुळेच येथे कोरोनाचे रुग्ण आढळून येणे शक्य असल्याचे अनेकांचे मत आहे. पण उत्तर कोरियाने अधिकृतपणे एकाही कोरोना प्रकरणाची माहिती दिलेली नाही. २५ दशलक्ष लोकसंख्या असलेल्या उत्तर कोरियाने कडक लॉकडाउन आणि प्रवास निर्बंध लागू केले आहेत.
पिटकेर्न बेटे
पिटकेर्न बेटे चार ज्वालामुखी बेटांचा समूह असून तो पॅसिफिक महासागरातील एकमेव ब्रिटिश साम्राज्याचा भाग आहे. तेथे ५० पेक्षा कमी पूर्णवेळ रहिवासी असल्याचे मानले जाते. या बेटावर पूर्वीच्या बाउंटीच्या खलाशांच्या वंशजांची वस्ती आहे. मात्र येथे यूएस सरकारने बेटांवर संसर्गजन्य रोगांचा उच्च धोका असल्याचा इशारा दिला आहे.
सेंट हेलेना
सेंट हेलेना बेट हे दक्षिण अटलांटिक महासागरातील ब्रिटीश साम्राज्याचा भाग आहे. हे बेट आफ्रिकेच्या नैऋत्य किनार्यापासून १९५० किमी अंतरावर आहे. सेंट हेलेनाचेही ऐतिहासिक महत्त्व आहे. फ्रान्सचा शासक असलेल्या नेपोलियन बोनापार्टलाही या बेटावर इंग्रजांनी ओलीस ठेवले होते.
टोकेलाऊ
दक्षिण प्रशांत महासागरातील तीन उष्णकटिबंधीय प्रवाळ बेटांनी हा देश बनलेला आहे. टोकेलाऊ हे न्यूझीलंडवर अवलंबून आहे. तीन प्रवाळांचे एकूण क्षेत्रफळ चार चौरस मैल आहे. मात्र येथे विमानतळ नाही. टोकलाऊला जाण्याचा एकमेव मार्ग समुद्रमार्गे आहे. सुमारे १५०० रहिवाशांची लोकसंख्या असलेले टोकेलाऊ संपूर्णपणे सोलर उर्जेवर चालणारे पहिले राष्ट्र म्हणून गणले जाते.
टोंगा
टोंगाने महामारीच्या सुरुवातीच्या काळात क्रूझ जहाजांवर निर्बंध घालून, विमानतळ बंद करून आणि लॉकडाउन लादून कोरोनाला त्याच्या किनाऱ्यापासून दूर ठेवले आहे. देशाने व्यवसाय प्रवास, सामूहिक धार्मिक कार्यक्रमांवर बंदी घातली आहे आणि सामाजिक अंतर आणि मास्क घालण्यास प्रोत्साहित केले आहे.
तुर्कमेनिस्तान
मध्य आशियामध्ये वसलेल्या तुर्कमेनिस्तानमध्ये कोरोनाची साथ न पोहोचल्याने अनेकांना आश्वर्य वाटत आहे. कारण सीमेला लागून असलेल्या सर्व देशांमध्ये कोरोनाचा भयंकर उद्रेक दिसून येतो. तथापि, तुर्कमेनिस्तानमध्ये अद्याप कोरोनाच्या एकाही प्रकरणाची माहीती झालेली नाही. यासोबतच अनेक कडक उपाययोजनाही करण्यात आल्या आहेत.
तुवालू
हवाई आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान स्थित, तुवालू तीन खडक आणि सहा कोरल बेटांनी बनलेले आहे. हे १० चौरस मैलाने व्यापले असून त्याची लोकसंख्या सुमारे १० हजार आहे. येथे नागरिकांना सक्तीचे अलग ठेवणे लागू आहे. यासोबतच आपली सीमा बंद करून कोरोनाला रोखण्यात यश आले आहे.