इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – उत्तर कोरियाचा हुकुमशहा किम जोंग उन याच्या प्रत्येक हालचालीवर जगाचं लक्ष असतं. पण त्याहीपेक्षा जास्त लक्ष स्वतः किम जोंग उन जगातील बारीक सारीक हालचालींवर लक्ष ठेवून असतो. स्वतःला सर्वश्रेष्ठ दाखविण्याचा त्याचा प्रयत्न अत्यंत विचित्र असतो. अलीकडेच त्याने आपल्या प्रायव्हेट ट्रेनच्या माध्यमातून त्याची प्रचिती जगाला दिली आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्या एका छोट्याशा कृतीमुळे हे घडल्याचा निष्कर्श जागतिक राजकीय घडामोडींच्या अभ्यासकांनी लावला आहे. जो बायडेन हे अलीकडेच युक्रेन दौऱ्यावर गेले होते. तेथे त्यांनी ट्रेनने प्रवास केला. जो बायडेन यांच्यासाठी सज्ज करण्यात आलेल्या ट्रेनची छायाचित्रे व व्हिडियो सर्वदूर जगात पसरली. यात किम जोंग उन लक्ष घालणार नाही, हे तर मुळीच शक्य नाही.
विशेष म्हणजे जगभरातील माध्यमे बायडेन यांच्यासाठी तयार करण्यात आलेल्या ट्रेनची तुलना किम जोंग उनच्या खासगी ट्रेनशी करू लागले तेव्हा मात्र विषक अधिकच चिघळला. कारण किम जोंग उनच्या खासगी ट्रेनची चर्चा संपूर्ण जगात सध्या ताजी आहे. मग उत्तर कोरिया प्रशासनाकडून या ट्रेनचे वैशिष्ट्य अधिक जोरकसपणे जगभरात पोहोचविण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. कारण ही ट्रेन साधी रेल्वे गाडी नसून चक्क एखाद्या राजवाड्याप्रमाणे आहे.
२२ कोचची ट्रेन
किम जोंग उनच्या या ट्रेनला २२ कोच आहे आणि प्रत्येक कोचला प्रशस्त बाथरूम आणि डायनिंगरूम आहे. या ट्रेनने प्रवास करण्यासाठई सुरक्षा रक्षक आणि सेवेकरी वगळता फक्त किम जोंग किंवा त्याचे कुटुंबीयच असतात. या ट्रेनच्या आतील संपूर्ण सोयीसुविधा जगापर्यंत पोहोचू नयेत याची संपूर्ण काळजी उत्तर कोरिया सरकारकडून घेण्यात आली आहे. त्यामुळे तशी ही ट्रेन जगासाठी रहस्यमयच आहे.
सेवेसाठी महिला कर्मचारी
किम जोंगच्या या ट्रेनमध्ये त्याच्या सेवेसाठी महिला कर्मचारी मोठ्या प्रमाणात आहेत. त्याच्या सुरक्षेला धोका पोहोचू नये म्हणून रॉयल ट्रेनसाठी स्वतंत्र स्थानकं निर्माण करण्यात आली आहेत. ही बुलेटप्रुफ ट्रेन एखाद्या राजवाड्यासाठी आहे. यात महागड्या दारूपासून उत्तमोत्तम खाद्यपदार्थ उपलब्ध आहे. त्यामुळे जेव्हाही त्याला प्रवास करायचा असेल तो याच ट्रेनने प्रवास करतो.
चीनचाही दौरा
किम जोंग उनने या ट्रेनने चीनचाही दौरा केला आहे. तर व्हिएतनामपर्यंतही तो ही ट्रेन घेऊन गेला आहे. सामान्य ट्रेनच्या तुलनेत ही ट्रेन वजनाने जड असल्यामुळे वेगाने धावू शकत नाही. या ट्रेनमधील रॉयल बेडरूम कायमच जगासाठी कुतुहलाचा विषय राहिला आहे.
North Korean Leader Kim Jong Un Special Train Features