इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – सरकारी अधिकाऱ्यांना एकाच प्रकारचा हेअरकट करण्याचा आदेश देणे किंवा विचित्र शिक्षांमुळे आणि वागणुकीमुळे उत्तर कोरियाचा हुकूमशाह किम जोंग उन जगात नेहमीच चर्चेत राहतो. एका बातमीमुळे तो पुन्हा चर्चेत आला आहे. किम जोंग याचे अधिकारी सध्या प्यांगयाँग शहरातील नागरिकांच्या हस्ताक्षराची पडताळणी करत आहेत. परंतु सरकारी अधिकारी अचानक नागरिकांच्या हस्ताक्षराची पडताळणी का करत आहेत? याचे उत्तर ऐकून ही तुम्हाला आश्चर्य वाटेल.
येथील एका इमारतीवर किम जोंग उनबद्दल आक्षेपार्ह मजकूर लिहिण्यात आला. या इमारतीवर भित्तीचित्र काढून हुकूमशाहला चक्क कुत्र्याचे पिल्लू असे संबोधल्याने एकच खळबळ उडाली. द डेली एनके म्हणजेच नॉर्थ कोरियाच्या संकेतस्थळावर दिलेल्या वृत्तानुसार हे प्रकरण समोर आल्यानंतर सरकारी अधिकार्यांनी शहरात कारवाईचा धडाका सुरू केला आहे.
किम जोंग उन याच्या आईला कुत्रीची उपमा दिल्याने हे प्रकरण चांगलेच तापले आहे. ”किम जोंग उन हा सन ऑफ ***** असून, तुझ्यामुळेच नागरिक उपाशी मरत आहे”, असा मजकूर या पोस्टरवर लिहिण्यात आला आहे. प्यांगयॉंग जिल्ह्यातील एका इमारतीवर हा मजकूर लिहिल्याचे २२ डिसेंबर रोजी उजेडात आले. हा प्रकार उजेडात आला तेव्हा किम जोंग उनच्या वर्कर्स पार्टी ऑफ कोरियाची बैठक याच इमारतीत सुरू होती. नेते बैठकीतून बाहेर येण्यापूर्वी प्रशासनाने हा मजकूर पुसून टाकला.
हा प्रकार घडल्यानंतर प्रशासकीय अधिकारी घरोघरी जाऊन संशयिताचा शोध घेत आहेत. प्रत्येक घरी जाऊन नागरिकांच्या हस्ताक्षराचे नमुने घेतले जात आहे. त्यामुळे संपूर्ण शहराचीच चौकशी सुरू झाल्याचे चित्र आहे. त्या दिवशी इमारतीजवळ कोण-कोण आले होते, त्यांना शोधण्याचा प्रयत्न अधिकारी करत आहेत. इमारतीजवळील सीसीटीव्ही कॅमर्याच्या माध्यमातूनही संशयिताचा शोध घेतला जात आहे.
किम जोंग उन याचे वडील आणि आधीचे हुकूमशाह किम जोंग दुसरे यांची १७ डिसेंबरला पुण्यतिथी होती. तसेच किम जोंग उनची आई किम जोंग सूक यांचा वाढदिवस २४ डिसेंबरला होता. ही घटना त्या दोन्ही दिवसांच्या दरम्यान घडल्याने हे प्रकरण चांगलेच तापले आहे. पूर परिस्थिती आणि कोरोनामुळे चीनला लागून असलेली सीमा बंद केल्याने उत्तर कोरियामध्ये सध्या तीव्र अन्नटंचाई निर्माण झाली आहे. याच पार्श्वभूमीवर कोणीतरी हा मजकूर लिहिल्याचे बोलले जात आहे.
चीनसोबतची सीमा २०२५ रोजी उघडण्यात येणार आहे. अन्नधान्याची टंचाई दूर करण्यासाठी नागरिकांनी कमी खावे, असा फतवा प्रशासनाने काढल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान उत्तर कोरियातील सर्वोच्च नेत्यावर टीका करणे हा गुन्हा असून, असे करणार्यांविरुद्ध देशद्रोहाचा गुन्हा खटला दाखल केला जातो.