इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – उत्तर कोरियातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथे हुकूमशहा किम जोंग उन यांनी एका शहरात लॉकडाऊन केले आहे कारण या शहरातील सैनिकांकडून 653 बंदुकीच्या गोळ्या गायब झाल्या आहेत. आता ते शोधण्यासाठी संपूर्ण शहरात लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. रेडिओ फ्री एशियाने दिलेल्या वृत्तानुसार, ७ मार्च रोजी लष्करी माघार घेत असताना दारूगोळ्याच्या ६५३ राऊंड बेपत्ता झाले. जोपर्यंत सर्व गोळ्या सापडत नाहीत, तोपर्यंत शहरात लॉकडाऊन राहील, असा शासनाचा कडक आदेश आहे. पोलीस आणि लष्कर दोघेही मिळून त्याचा शोध घेत आहेत, मात्र 10 दिवस उलटून गेले तरी अद्याप या गोळ्या सापडलेल्या नाहीत.
रेडिओ फ्री एशियाच्या वृत्तानुसार, ही घटना रियांगगँगच्या उत्तर भागातील हेसन शहरात घडली. शहरात लॉकडाऊन लागू झाल्यामुळे दोन लाख लोकसंख्या घरात कैद झाली आहे. बंदुकीच्या गोळ्या गायब झाल्यापासून सैनिकांची शोध मोहीम सुरू आहे. अधिकारी घरोघरी शोधमोहीम राबवत आहेत.
अहवालानुसार, 7 मार्च रोजी कोरियन पीपल्स आर्मी 7वी बटालियन या भागातून परतली. कोविड-19 साथीच्या आजाराच्या सुरूवातीला चिनी सीमा बंद करण्यासाठी 2020 मध्येच 7 वी बटालियन तैनात करण्यात आली होती. कोरोनाचे संकट संपल्यानंतर लष्कराला माघारी बोलावण्यात आले. याचदरम्यान गोळ्या गायब झाल्या.
सुरुवातीला स्वत: जवान त्याचा शोध घेण्यात व्यस्त होते, मात्र, गोळ्या सापडल्या नाहीत. नंतर अधिकाऱ्यांना याची माहिती देण्यात आली. यानंतर लॉकडाऊन लागू करून संपूर्ण शहर सील करण्यात आले. वृत्तानुसार, संपूर्ण शहर सील करण्यात आले आहे. पोलिस आणि लष्कराकडून घरोघरी झडती सुरू आहे. मात्र तपास सुरू होऊन दहा दिवस उलटून गेले तरी कोणताही सुगावा लागलेला नाही.
North Korea Gun 653 Bullets Disappeared Kim Jong Un Order