इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – उत्तर कोरियामध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आला आहे. त्याची गंभीर दखल कोरियाचे हुकुमशहा किम जोंग ऊन याने घेतली आहे. त्यामुळेच देशात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. किम जोंग उन याने ‘गंभीर आणीबाणी’ असे नाव दिले आहे. आतापर्यंत उत्तर कोरियात कोरोनाचा शिरकाव झाला नव्हता. तसेच, कोरोनावर विश्वास ठेवण्यास नकार दिला होता. पण आता या प्रकरणालाच पुष्टी मिळाली असून निर्बंधही जाहीर करण्यात आले आहेत. उत्तर कोरियामध्ये यापूर्वीही कोरोना संसर्गाची अनेक प्रकरणे आढळून आल्याचा दावा काही अहवालांमध्ये करण्यात आला आहे. कोरियन सेंट्रल न्यूज एजन्सीने सांगितले की, प्योंगयांगमध्ये आढळलेल्या रुग्णाला तापाची लक्षणे होती आणि तपासणीनंतर स्पष्ट झाले आहे की त्याला ओमिक्रॉन बीए.2 ची बाधा झाली आहे.
किम जोंग उन यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक बोलावली आणि त्यानंतर कोरोना संकटाचा सामना करण्यासाठी लॉकडाऊनची घोषणा केली. किम जोंग उन यांनी आदेश दिले की सर्व शहरांमध्ये लॉकडाऊन लागू करण्यात यावे आणि निर्बंधांचे पालन करावे. मात्र, कोरियन नागरिकांवर कोणते निर्बंध घालण्यात आले आहेत, हे अद्याप समोर आलेले नाही. लॉकडाऊनची घोषणा करताना किम जोंग उन यांनी देश कोरोना संसर्गावर विजय मिळवेल अशी ग्वाही दिली. निर्माण झालेल्या परिस्थितीवर आम्ही मात करू आणि लवकरच त्यावर विजय मिळवू, असे ते म्हणाले.
आतापर्यंत उत्तर कोरियामध्ये कोरोनाचे किती रुग्ण आढळले आहेत हे स्पष्ट झाले नाही, परंतु केवळ एका प्रकरणाची पुष्टी झाली आहे. देशात मोठ्या प्रमाणात संसर्गाची प्रकरणे आढळून आली असण्याची भीती आहे, त्यानंतरच लॉकडाऊन जाहीर करण्यात आला असल्याचे बोलले जात आहे. वास्तविक उत्तर कोरियाची लोकसंख्या 25 दशलक्ष आहे आणि आतापर्यंत तेथे लसीकरण मोहीम राबवण्यात आलेली नाही. अशा स्थितीत त्याच्यासमोर मोठे संकट उभे राहू शकते, असे मानले जात आहे. सोल-आधारित प्रोफेसर लीफ एरिक इस्ले म्हणाले की प्योंगयांगने हे प्रकरण सार्वजनिकपणे कबूल केले आहे आणि तेथील आरोग्य व्यवस्था खूपच कमकुवत आहे.
याशिवाय लॉकडाऊनपासून संसर्गाचा सामना करण्याच्या धोरणावरही प्रश्न उपस्थित केले जात आहेत. कारण हे धोरण Omicron प्रकाराच्या विरोधात काम करत असल्याचे दिसत नाही. चीनमध्ये कठोर लॉकडाऊन लागू करून शून्य कोविड केसची रणनीती अवलंबली गेली, परंतु ती यशस्वी होऊ शकली नाही. खास म्हणजे, उत्तर कोरियाने जागतिक आरोग्य संघटना, रशिया आणि चीनने दिलेल्या लसींच्या ऑफर नाकारल्या होत्या. आणि आता रुग्ण आढळल्याने उत्तर कोरिया काय निर्णय घेणार याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.