मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महाविद्यालयीन शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करावा, महाविद्यालयातील शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या रिक्त असलेली पदे भरण्यास मान्यता द्यावी, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी या मागण्यांसाठी महाविद्यालयीन शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी आंदोलन पुकारले आहे. या आंदोलनाचा फटका बारावीच्या विद्यार्थ्यांना बसला असून त्यांच्या प्रात्यक्षिक परीक्षा रखडल्या आहेत. आंदोलन सुरू राहिल्यास लेखी परीक्षादेखील प्रभावित होण्याची भीती व्यक्त होत आहे.
राज्यभरात आपल्या विविध मागण्यांसाठी कनिष्ठ महाविद्यालय त्यासोबतच पदवी महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी आंदोलन पुकारले असून त्यांनी परीक्षांच्या कामावर बहिष्कार टाकला आहे. एकीकडे एक फेब्रुवारीपासून बारावी बोर्डाच्या प्रात्यक्षिक परीक्षा सुरु झालेल्या असताना दुसरीकडे शिक्षकेतर कर्मचारी या परीक्षांना कुठल्याही प्रकारे सहकार्य करत नसल्याने आणि परीक्षांच्या कामावर बहिष्कार टाकल्याने प्रात्यक्षिक परीक्षांना या आंदोलनाचा मोठा फटका बसत आहे. यामुळे शिक्षकांना आणि बारावी बोर्डाची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.
विद्यार्थ्यांसमोर पेच
बारावी बोर्डाच्या लेखी परीक्षेला २१ फेब्रुवारीपासून सुरुवात होत आहे. १६ फेब्रुवारीपर्यंत प्रात्यक्षिक परीक्षा पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र, अनेक महाविद्यालयांमध्ये या प्रात्यक्षिक परीक्षा घेण्यास शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे अडचणी येत आहेत. बायोलॉजी, केमिस्ट्री फिजिक्स यासारख्या विषयांच्या प्रॅक्टिकल परीक्षांसाठी लॅब असिस्टंटवर मोठी जबाबदारी असते. या आंदोलनामुळे लॅब असिस्टंट उपलब्ध नसल्याने अडचणी निर्माण होत आहेत.
बोर्डाच्या प्रात्यक्षिक परीक्षांवर परिणाम होणार नाही : मुंबई बोर्ड
बारावी बोर्डाच्या प्रात्यक्षिक परीक्षांवर कुठल्याही प्रकारचा परिणाम होणार नसल्याचं स्पष्टीकरण मुंबई बोर्डाने दिले आहे. शिवाय, महाविद्यालयांना पूर्णपणे सहकार्य केलं जाईल असं मुंबई बोर्डाकडून सांगण्यात आलं आहे. मात्र, कुठल्याही प्रकारचे सहकार्य बोर्डाकडून मिळत नसल्याने प्राचार्य, शिक्षक हवालदिल झाले आहेत.
Non Teaching Staff Agitation HSC Student Exam Pending