नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – आज संपूर्ण भारताचे लक्ष दोन गोष्टींकडे लागून आहे. एक म्हणजे भारत आणि पाकिस्तान सामना आणि दुसरे म्हणजे नोएडातील ३२ मजली इमारत पाडण्याकडे. जगभरात प्रथमच एवढ्या मोठ्या इमारतीचे पाडकाम होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर ही इमारत जमीनदोस्त होणार आहे.
नोएडाच्या सेक्टर ९३ मधील सुपरटेक एमराल्ड सोसायटीमध्ये भ्रष्टाचाराच्या पायावर बांधलेले ट्विन टॉवर आज काही तासांनंतर पाडण्यात येणार आहेत. हे टॉवर पाडण्याची सर्व तयारी पूर्ण झाली आहे. आतापर्यंत एमराल्ड कोर्ट आणि एटीएस ग्रीन सोसायटीच्या सर्व १३९६ फ्लॅट पूर्णपणे रिकामे करण्यात आले आहेत. फ्लॅटमध्ये राहणारे सर्व रहिवासी आपली घरे सोडून सुरक्षित स्थळी निघून गेले आहेत. त्यापैकी काही जण आपल्या मित्र-मैत्रिणींकडे, तर काही जण यात्रेला आणि हिलस्टेशनला गेले आहेत. तर काहींनी हॉटेलमध्ये खोल्या भाड्याने घेतल्या आहेत. काही लोकांच्या राहण्यासाठी जवळपासच्या इतर सोसायट्यांमध्येही व्यवस्था करण्यात आली आहे. पोलिसांनी संपूर्ण परिसर आपल्या सुरक्षेखाली घेतला असून आता टॉवर्सभोवती इतरांच्या प्रवेशावर बंदी घातली आहे.
आज दुपारी २ वाजून २९ मिनिटांनी विध्वंस तज्ञ चेतन दत्ता ब्लॅक बॉक्सला जोडलेले हँडल १० वेळा फिरवतील. यानंतर त्यात बसवलेला लाल बल्ब लुकलुकायला सुरुवात होईल. याचा अर्थ असा होईल की चार्जर स्फोटासाठी तयार आहे. यानंतर दत्ता हे हिरवे बटण दाबतील. यामुळे चार डिटोनेटरपर्यंत विद्युत लहरी जातील. त्यानंतर अवघ्या ९ ते १२2 सेकंदात इमारतीत एकामागून एक स्फोट होतील. स्फोटांमुळे ३२ मजली इमारत मोठ्या ढिगाऱ्यामध्ये रुपांतरीत होईल. या एका मिनिटात घडलेल्या घटनांची इतिहासात नोंद होणार असून देशातील सर्वात उंच इमारत पाडण्याचा विक्रम नोएडाच्या नावावर नोंदवला जाणार आहे.
सुपरटेक एमराल्ड सोसायटीचे रेसिडेंट वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष उदयभान सिंग तेवतिया म्हणतात की, इमारत पाडल्यामुळे अनेक चिंता आहेत, पण बेकायदेशीरपणे बांधलेल्या इमारती पाडल्या जात आहेत आणि आमचा दहा वर्षांचा संघर्ष आज संपुष्टात येत आहे. याचा मनस्वी आनंद आहे. हे टॉवर पाडण्याचा पहिला आदेश उच्च न्यायालयाने एप्रिल २०१४ मध्ये दिला होता. त्यानंतर वर्षभरापूर्वी सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिले आणि आता दीर्घ प्रतीक्षेनंतर अखेर हा टॉवर पाडण्यात येणार आहे. इमारत कोसळल्यास किती धूर आणि धूळ बाहेर पडेल हे अद्याप कळू शकलेले नाही. त्याचा सर्वात वाईट परिणाम लहान मुले आणि वृद्धांच्या आरोग्यावर होणार आहे. या समस्येसाठी तुमची योजना काय आहे? असे नोएडा प्राधिकरणाला विचारले असता त्यांनी कुठलेही ठोस उत्तर दिलेले नाही. त्यामुळे ही बाब अतिशय गंभीर असल्याचे सांगितले जात आहे. शिवाय या घटनेकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.
Noida Twin Tower Demolition Process Soon
Historic Green Button Few Second Procedure Uttar Pradesh