नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – जगभरातील उंच इमारतींची नेहमी चर्चा होते, इतकेच नव्हे तर जगात सर्वात उंच इमारत कोणती याचीही नागरिकांना उत्सुकता असते. भारतातही अशा अनेक इमारती आहेत परंतु त्यापैकीच उंच असलेल्या एक इमारत आता पाडण्यात येणार आहे. नोएडातील सेक्टर 93 मधील वादग्रस्त ठरलेली 32 मजली सुपरटेक ट्विन टॉवर इमारत दि. 28 ऑगस्ट रोजी केवळ 12 सेकंदात जमीनदोस्त होणार आहे. या घटनेकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.
दिल्लीतील ऐतिहासिक कुतुबमिनारपेक्षाही उंच असलेली ही इमारत आता अखेर भूईसपाट होणार आहे. जमीनदोस्त होणारी ही देशातील सर्वात उंच इमारत ठरणार आहे. 5000 लोक जे या इमारतीच्या आसपास राहतात, त्यांना काही काळासाठी सुरक्षित ठिकाणी जावे लागणार आहे. त्यासाठी जवळपास 95 रहिवाशांचे स्थलांतर पूर्ण झाले आहे. आज दिवसभरात उर्वरीत रहिवासी ही इमारत सोडणार आहेत. त्यानंतर उद्या दुपारी हे मोठे मिशन फत्ते होणार आहे.
या इमारतीला नोएडा विकास प्राधिकरणाने मंजुरी दिली होती. परंतु या मंजुरीला आक्षेप घेण्यात आला. अनेक वर्षांच्या न्यायालयीन लढाईनंतर सर्वोच्च न्यायालयाने या इमारतीला नोएडा विकास प्राधिकरणाने दिलेली मंजुरी अवैध असल्याचा निर्वाळा दिल्यानंतर ही इमारत भूईसपाट होणार हे निश्चित झाले. सदर इमारत मुंबईतील ईडीफीस इंजीनिअरिंग व दक्षिण आफ्रिकेतील जेट डेमोलेशन कंपनी भूईसपाट करणार आहे. 3500 किलोग्रैम विस्फोटकांचा उपयोग करणार. 35 हजार घनमीटर मलबा ही इमारत पाडल्यानंतर जवळपास जमा होईल.
ही इमारत रविवारला दुपारी अडीच वाजता पाडली जाणार आहे, तेव्हा धुळीने वातावरण व्यापले जाणार असल्याने या काळात दिल्ली विमानतळावरून विमानांची वाहतूक बंद ठेवण्याचे निर्देश दिलेले आहेत. जवळपास अर्धा तास दिल्लीच्या आकाशात विमान राहणार नाही. त्यामुळे आता इमारत कशी पडते? याची परिसरातील नागरिकांना उत्सुकता आहे.
Noida Supertech Twin Tower Demolished Preparation