विशेष प्रतिनिधी, मुंबई
राज्यात उद्या आणि परवा (१५ व १६ मे) या दोन्ही दिवशी लसीकरण बंद राहणार आहे. कोविशिल्ड लसीच्या दोन डोसमध्ये अंतर वाढविण्यात आले आहे. मात्र, तसे कोविन या अॅपमध्ये अद्याप बदल करण्यात आलेले नाहीत. या बदलांसाठी आणि कोविन अॅपच्या अपग्रेडेशनसाठी लसीकरण मोहिम बंद राहणार असल्याचे प्रशासनाने सांगितले आहे.
केंद्र सरकारच्या आरोग्य विभागाने ‘कोविशिल्ड’ या लसीचा पहिला डोस दिल्यानंतर दुसरा डोस देण्याचा कालावधी हा ६ ते ८ आठवड्यांवरून १२ ते १६ आठवडे असा केलेला आहे. त्यामुळे आजपासून (१५ मे) ज्यांनी कोविशिल्ड चा पहिला डोस घेवून ८४ दिवस पूर्ण झालेले आहेत. त्यांनाच दुसरा डोस दिला जाईल उर्वरीत ज्यांचा विहित १२ ते १६ आठवड्यांचा कालावधी पूर्ण झाला नसेल त्यांना दुसरा डोस दिला जाणार नाही,त्यामुळे कोविशिल्ड चा पहिला डोस घेतलेल्या नागरिकांनी दुसऱ्या लसीसाठी घाई करू नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. दोन डोसमधील अंतराचा योग्य तो बदल कोविन अॅपवर करणे आवश्यक आहे. तो करण्यासाठीच दोन दिवस लसीकरण बंद राहणार आहे.