मुंबई – आजच्या काळात दुचाकी वाहन जणू प्रत्येकाची गरज बनली आहे, परंतु त्यासाठी ड्रायव्हिंग लायसन काढणे ही कटकटीची गोष्ट वाटते. मात्र आता ड्रायव्हिंग लायसन्स शिवाय देखील स्कूटर चालविणे शक्य होणार आहे. या नव्या स्कूटरसाठी ड्रायव्हिंग लायसन्स ची गरज नाही. त्यामुळे सध्या देशात इलेक्ट्रिक स्कूटरची मागणी झपाट्याने वाढली आहे.
सदर किफायतशीर इलेक्ट्रिक स्कूटरची किंमत कमी असून ती उत्तम ड्रायव्हिंग रेंज देखील प्रदान करते. या इलेक्ट्रिक स्कूटरची चालवण्यासाठी ड्रायव्हिंग लायसन्सची गरज नाही तसेच वाहन नोंदणीची देखील गरज नाही, त्यामुळे यापैकी ४ इलेक्ट्रिक स्कूटर बद्दल जाणून घेऊ या-
हिरो इलेक्ट्रिक फ्लॅश एलएक्स
हिरो इलेक्ट्रिक ही देशातील आघाडीची इलेक्ट्रिक वाहन उत्पादक कंपनी आहे. या कंपनीची फ्लॅश एलएक्स दुचाकीसाठी एक चांगला पर्याय असू शकतो. यामध्ये कंपनीने 250W क्षमतेची इलेक्ट्रिक मोटर आणि 51.2V / 30Ah क्षमतेची बॅटरी पॅक वापरली आहे. या स्कूटरसाठी ड्रायव्हिंग लायसन्स किंवा नोंदणीची आवश्यकता नाही. याचा टॉप स्पीड ताशी 25 किमी आणि ड्रायव्हिंग रेंज ताशी 85 किमी आहे. ती पूर्ण चार्ज होण्यासाठी 4 ते 5 तास लागतात. या स्कूटरची किंमत: 56,940 रुपये (एक्स-शोरूम) आहे.
लोहिया ओमा स्टार ली
लोहिया मोटर्स प्रस्तुत, ओमा स्टार ली नवीन स्कूटर आहे. तिचा टॉप स्पीड 25 किमी प्रति तास असून यासाठी परवाना आणि नोंदणी सारख्या कागदपत्रांची गरज नाही. यात 250W इलेक्ट्रिक मोटर आणि 30Ah बॅटरी पॅक आहे. ही स्कूटर जास्तीत जास्त 100 किमी पर्यंत ड्रायव्हिंग रेंज देते आणि पूर्ण चार्ज होण्यासाठी सुमारे 3 तास लागतात. यात ड्रम ब्रेक्ससह हायड्रोलिक टेलिस्कोपिक सस्पेंशन आहे. तिची किंमत: 51,750 रुपये (एक्स-शोरूम) आहे.
अँपिअर रिओ एलिट
अँपिअर व्हेईकल्स हा मुळात ग्रीव्हज कंपनीचा ब्रँड आहे आणि ही कंपनी दीर्घ काळापासून इलेक्ट्रिक वाहनांची यशस्वी विक्री करत आहे. कंपनीने आता रिओ एलीट लाँच केले असून यात 48V-27Ah क्षमतेचा बॅटरी पॅक आहे. 25 kmph च्या टॉप स्पीडसह, ही स्कूटर एका चार्जमध्ये 60 किमी पर्यंत ड्रायव्हिंग रेंज देते. त्याची बॅटरी पूर्ण चार्ज होण्यासाठी 8 ते 10 तास लागतात. कंपनी त्या बॅटरीवर 1 वर्षाची वॉरंटी देते. तिची किंमत: 43,000 रुपये (एक्स-शोरूम ) आहे.
डिटेल इझी प्लस
आजच्या काळातील ही सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटर आहे. डिटेल कंपनीने इलेक्ट्रिक मोपेड, इझी प्लस लाँच केले. इच्छुक ग्राहक हे इलेक्ट्रिक मोपेड कंपनीच्या अधिकृत वेबसाईटद्वारे फक्त 1,999 रुपयांमध्ये (टोकन रक्कम) बुक करू शकतात. या इलेक्ट्रिक मोपेडमध्ये 170 एमएमचे सर्वोत्तम ग्राउंड क्लिअरन्स आहे. यामध्ये 48V आणि 20Ah क्षमतेचा बॅटरी पॅक वापरण्यात आला आहे. बॅटरी सीटखाली बसवली आहे. हे वाहन एका चार्जमध्ये 60 किमी पर्यंत ड्रायव्हिंग रेंज देते. तर किंमत: 39,999 रुपये (जीएसटी शिवाय) आहे.