नाशिक – नो हेल्मेट नो पेट्रोल या संकल्पनेचा रविवारी (दि.१५) पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते शुभारंभ होणार आहे. हेल्मेट सक्तीसाठी हा उपक्रम हाती घेण्यात आला असून नागरीकांनी हेल्मेटचा वापर करावा असे आवाहन पोलीसांच्या वतीने करण्यात आले आहे. गंगापूररोडवरील सदभावना पेट्रोल पंपावर मंत्री भुजबळ यांच्या उपस्थीत हा शुभारंभ सोहळा पार पडणार आहे. रस्ता अपघातातील मृतांची संख्या लक्षात घेवून हेल्मेट सक्तीची अंमलबजावणी केली जाते. मात्र बेशिस्तांकडून त्यास बगल दिली जाते या पार्श्वभूमिवर पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय यांच्या संकल्पनेतून नो हेल्मेट नो पेट्रोल हा उपक्रम पुढे आला आहे. पेट्रोल पंप चालकांच्या संमतीने हा उपक्रम शहर पोलीसांनी हाती घेतला असून त्याचा शुभारंभ स्वातंत्र दिनी केला जाणार आहे. त्यामुळे पेट्रोल पंपावर हेल्मेटधारी मोटारसायकलस्वारांनाच यापूढे पेट्रोल मिळणार आहे.या सोहळयास आयुक्तांसह उपायुक्त संजय बारकुंड, अमोल तांबे ,विजय खरात, पौर्णिमा चौगुले – श्रींगी तसेच सर्व सहाय्यक आयुक्त,पोलीस अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थीत राहणार आहेत.