विशेष प्रतिनिधी, नाशिक
कोरोना बाधित रुग्णांवर महापालिकेच्या विविध कोविड सेंटरमध्ये उपचार केले जातात. मात्र, याठिकाणी बाधितांचे नातेवाईक किंवा कुटुंबिय अनावश्यकरित्या गर्दी करतात. त्यामुळे तेथील यंत्रणेवर ताण येतो शिवाय कोरोनाचा संसर्ग पसरण्याचीही भीती असते. याची गंभीर दखल महापालिका प्रशासनाने घेतली आहे. त्यामुळेच महापालिका रुग्णालये तसेच मनपा कोविड सेंटरच्या परिसरात गर्दी करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. डबा देण्यासाठी किंवा अन्य कारणासाठी रुग्णालय किंवा कोविड सेंटरच्या परिसरात घुटमळणाऱ्यांवर पहिल्यांदा १ हजार रुपयांचा दंड केला जाणार आहे. जर ती व्यक्ती दुसऱ्यांदा तेथे आढळली तर थेट ५ हजार रुपयांचा दंड केला जाणार आहे. या निर्णयामुळे गर्दीला लगाम बसेल, अशी अपेक्षा महापालिकेला आहे.