नाशिक – महापालिका आयुक्त कैलास जाधव यांच्या बदलीची चर्चा जोरदार रंगू लागली आहे. नाशिकच्या मनपा आयुक्तपदी विसाई विरार महापालिकेचे आयुक्त गंगाधरण डी यांची नियुक्ती करण्यात आल्याचेही बोलले जात आहे. यास अधिकृत दुजोरा मिळू शकला नसला तरी चर्चांना उधाण आले आहे. विशेष म्हणजे, आयुक्त जाधव यांनी नाशिक मनपाची सूत्रे गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात घेतली होती. त्यापूर्वी राधाकृष्ण गमे हे नाशिक मनपा आयुक्त होते. गमे यांची नाशिक विभागीय महसूल आयुक्तपदी बदली करण्यात आल्यानंतर जाधव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अवघ्या १४ महिन्यांमध्येच त्यांच्या बदलीची चर्चा रंगल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाचे संकट घोंघावत आहे. नाशिक शहरातील कोरोना संसर्ग आटोक्यात ठेवण्यापासून विविध विकास कामांना चालना देण्याचे आव्हान नाशिक महापालिकेवर आहे. यासंदर्भात आयुक्त जाधव यांनी विविध निर्णय घेतले आहेत.
निवडणुकीमुळे की अन्य कारण
नाशिक महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक येत्या फेब्रुवारी महिन्यात होणार आहे. या निवडणुकीपूर्वीच आयुक्तांची बदली होत असल्याने निवडणुकीसाठी त्यांची बदली करण्यात आली आहे का, असा सूर आळवला जात आहे. मात्र, काहींच्या मते पालकमंत्री छगन भुजबळ हे आयुक्त जाधव यांच्या कारभारावर समाधानी नसल्याचेही बोलले जात आहे. खरे कारण अद्याप समोर आलेले नाही. तसेच, बदलीचे आदेशही अद्याप आलेले नसल्याने चर्चा आणि अफवांना ऊत आला आहे.