नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– ॲडव्होकेट महेंद्र एकबोटे यांनी नाशिक मधील पहिले लिव्हींग विल नोंदवुन महाराष्ट्र राज्य सरकारने नामनिर्देशित केलेले कस्टोडिअन डॉ. प्रशांत शेटे, सहाय्यक वैद्यकिय आरोग्य अधिकारी, नाशिक महानगरपालिका आरोग्य विभाग, यांचे ताब्यात सुपुर्द केले. अशारितीने ॲडव्होकेट महेंद्र एकबोटे यांनी नाशिकमधील पहिले ‘ॲडव्हान्स मेडीकल डायरेक्टीव्ह’ अंमलात आणुन कार्यान्वित केले आहे.
‘लिव्हींग विल म्हणजे एखाद्या व्यक्तीने आपल्या हयातीतच लिहिलेले वैद्यकिय सेवेबाबतचे इच्छापत्र’ ज्यामध्ये भविष्यात एखादा गंभीर आजार उद्भवल्यास आपण शुद्धीत नसतांना किंवा आपल्या शरीराला कोणत्याही जाणिवा नसताना त्यावर कोणत्या प्रकारचे उपचार घ्यायचे अथवा नाकारायचे याचे स्पष्ट निर्देश लिखित स्वरुपात निर्देशित केलेले असावेत.
हॉस्पीटल मध्ये मृत्यु उगाचच लांबवला जाऊ नये अशी आपली इच्छा असल्यास लिव्हींग विल द्वारे ती पुर्ण करता येते. व्यक्ती आजारी पडल्यास जर तिचे शरीर आणि मेंदु काम करत नसतील तर व्हेंटिलेटर न लावता, तसेच नळ्यांनी अन्न न देता घरीच किंवा रुग्णालयात अंतिम श्वास घेऊ देण्याचा लिखित निर्णय लिव्हींग विल द्वारे घेता येतो.
आज वैद्यकिय तंत्रज्ञान खुपच प्रगत झाले आहे. अनेक उपकरणांचा वापर करुन माणसाचे जिवन लांबवता येते. मात्र असे जिवन लांबवणे हे आजचे मरण पुढे ढकलणे असे होता कामा नये. मे. सर्वोच्च न्यायालयाने Common Cause V/s Union of India या प्रकरणांत नागरिकांना सन्मानाने मृत्यु येण्याचा हक्क मान्य केलेला आहे. भारतात देहत्याग कायदेशिर नसला तरी मे. सर्वोच्च न्यायालयाने २०२३ रोजी पारित केलेल्या निर्णयामुळे मरण लांबवणाऱ्या उपचारांना नकार देण्याचा मार्ग सुकर केला आहे. ज्या योगे कोणतीही व्यक्ती आपल्यावर कुठवर आणि कितपत उपचार करावेत आणि ते कधी थांबवावेत हे ठरवु शकते.
आजही सुशिक्षित लोक देखील लिव्हींग विल (ॲडव्होकेट मेडीकल डायरेक्टीव्ह) या संकल्पनेबाबत अनभिज्ञ आहेत. लिव्हींग विल तयार करणे, नोंदवणे हे खुपच कमी खर्चिक आहे. लिव्हींग विल ही काळाची गरज असुन याबाबत समाजात प्रबोधन होणे गरजेचे आहे.