इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
स्वच्छ भारत अभियानांतर्गत केंद्र शासनामार्फत दरवर्षी घेण्यात येणाऱ्या स्वच्छ सर्वेक्षण २०२४-२५ मध्ये नाशिक महानगरपालिकेने उल्लेखनीय प्रगती करत देशात २२ वा व राज्यात १२ वा क्रमांक मिळवला आहे. मागील वर्षी देशपातळीवर ३१ व्या स्थानी असलेल्या नाशिक मनपाने यंदा १० स्तर उंचावून आपल्या कार्यक्षमतेची ठसठशीत नोंद केली आहे.
या सर्वेक्षणामध्ये देशभरातील शहरांचे स्वच्छता, कचरा व्यवस्थापन, मलनि:सारण व्यवस्था, सार्वजनिक ठिकाणांचे सौंदर्यीकरण, नागरी सहभाग आदी विविध निकषांवर आधारित त्रयस्थ संस्थेमार्फत मूल्यमापन करण्यात येते. यंदा १२,५०० गुणांच्या एकूण प्रणालीमध्ये नाशिक महापालिकेने १०,१२५ गुण प्राप्त करत ही उज्ज्वल कामगिरी बजावली.
विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे, नाशिक मनपाने १० लाखांवरील लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये (मिलियन प्लस सिटी) महाराष्ट्रात ४ था क्रमांक प्राप्त केला आहे. स्वच्छतेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची अशी मलनि:सारण व्यवस्थापन सुधारित करत नाशिक मनपाने ODF++ वरून “Water Plus” प्रमाणपत्र प्राप्त केले आहे. ही सर्वोच्च पातळीची मान्यता असून शहरातील मलनि:सारण पद्धती प्रभावीपणे कार्यरत असल्याचे याचे प्रतिक आहे.
तसेच, शहराच्या “Garbage Free City” (कचरा मुक्त शहर) मानांकनात मागील वर्षी प्राप्त केलेले ३ स्टार रेटिंग यंदाही कायम राखण्यात मनपाला यश आले आहे.
ही कामगिरी नाशिक महानगरपालिकेच्या आयुक्त मनिषा खत्री अतिरिक्त आयुक्त करिष्मा नायर यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वी झाली आहे.घनकचरा व्यवस्थापन विभागाचे संचालक अजित निकत यांनी घनकचरा विभागात विविध अधिकारी कर्मचारी यांच्यात समन्वय ठेऊन स्वच्छ सर्वेक्षणात उत्कृष्ट कामगिरी केली आहे मनपाचे सर्व अधिकारी-कर्मचारी यांची व जनसहभाग, आणि शहरवासीयांच्या सहकार्यामुळे हे शक्य झाले असल्याची भावना आयुक्त तथा प्रशासक मनिषा खत्री यांनी व्यक्त करून घनकचरा व्यवस्थापन विभागाचे कौतुक केले आहे. भविष्यातही “स्वच्छ नाशिक, सुंदर नाशिक” या उद्दिष्टाने अधिक व्यापक व सर्वसमावेशक स्वच्छता उपक्रम राबविण्याचा नाशिक महानगरपालिकेचा दृढ निश्चय असून कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शहर स्वच्छ व अधिक सुंदर करण्यासाठी नाशिक महानगरपालिका कटिबद्ध असल्याचे आयुक्त खत्री यांनी नमूद केले आहे.