नाशिक – नाशिक शहरात प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्ती विक्रीवर बंदी घालावी अशी मागणी आकाश पगार यांनी केली आहे. गोदावरी नदीचे प्रदूषण व नुकसान टाळण्यासाठी केंद्र सरकारने पीओपीच्या गणेश मूर्तींवर बंदी जाहीर केली आहे. तसेच मा.उच्च न्यायालय यांनी देखील ही बंदी कायम ठेवली आहे. नुकतीच चंद्रपूर महानगरपालिकेच्या वतीने देखील पीओपीच्या मुर्ती विक्रीवर बंदी घातली आहे. याच पार्श्वभूमीवर पीओपीच्या मुर्ती विक्रीवर बंदी घालावी अशी मागणी नाशिक महानगरपालिकेचे आयुक्त कैलास जाधव यांच्याकडे आकाश पगार यांनी केली आहे.
नाशिक शहरात कुठल्याही प्रकारे पीओपीच्या मुर्तीची निर्मिती, आयात, साठा व विक्री होऊ नये अशी मागणी यावेळी करण्यात आली. प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्ती त्यावर केलेले रासायनिक रंगकाम व इतर सौंदर्यप्रसाधंनामुळे गोदावरी नदीचे मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होते. गोदावरी नदीचे प्रदूषण थांबविण्यासाठी विद्यार्थी कृती समितीच्या माध्यमातून गेल्या १० वर्षांपासून “देव द्या, देवपण घ्या” हा उपक्रम राबविण्यात येतो. यंदाचे या उपक्रमाचे अकरावे वर्ष आहे. दरवर्षी नाशिककरांकडून संकलित केलेल्या हजारो गणेश मूर्ती नाशिक महानगरपालिकेकडे सुपूर्द करण्यात येतात.
दरवर्षा प्रमाणे यंदा देखील अनंत चतुर्दशी रविवार दि.१९ सप्टेंबर रोजी चोपडा लॉन्स जवळील गोदापार्क येथे सकाळी ८ ते ५ या वेळेत “देव द्या, देवपण घ्या” उपक्रमाचे कार्यकर्ते मूर्ती स्विकारण्यासाठी उपस्थित राहणार आहेत. याठिकाणी कृत्रीम तलावात पर्यावरणपूर्वक पद्धतीने मूर्तीचे विसर्जन करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर अमोनियम बाय कार्बोनेट उपलब्ध करून द्यावे अशी देखील मागणी यावेळी आयुक्त कैलास जाधव यांच्याकडे करण्यात आली आहे. यावेळी विशाल गांगुर्डे, सागर बाविस्कर, रोहित कळमकर, सिद्धांत आमले, सोनू जाधव, कोमल कुरकुरे, संकेत निमसे, सागर दरेकर, कैलास पाटील, रोशन अपसुंदे आदींनी चर्चेत सहभाग घेतला.