मुंबई – भूमि अभिलेख विभागातील गट ‘क’ संवर्गातील प्रादेशिक स्तरावरील पदे भरण्यासाठी प्रादेशिक निवड समिती स्थापन करण्यात आली आहे. महसूल व वन विभागामार्फत याबाबतचा शासन आदेश २५ ऑक्टोबर रोजी निर्गमित करण्यात आला आहे. भूमि अभिलेख विभागातील प्रादेशिक स्तरावर उपसंचालक भूमि अभिलेख, कोकण, पुणे, नाशिक, औरंगाबाद, अमरावती आणि नागपूर प्रदेशातील गट ‘क’ संवर्गातील पदे भरण्यासाठी निवड समिती गठित करण्यात आली आहे. या समितीमध्ये जमाबंदी आयुक्त आणि भूमि अभिलेख संचालक हे अध्यक्ष असतील. तसेच ज्या विभागातील पदे भरावयाची आहेत तेथे अन्य विभागाचे उपसंचालक भूमि अभिलेख, ज्या विभागातील पदे भरावयाची आहेत त्या विभागातील विभागीय कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी, ज्या विभागातील पदे भरावयाची आहेत त्या विभागातील विभागीय समाजकल्याण अधिकारी, ज्या विभागातील पदे भरावयाची आहेत त्या विभागातील आदिवासी विकास विभागाचे अपर आयुक्त, ज्या विभागातील पदे भरावयाची आहेत त्या विभागातील विभागीय सैनिक कल्याण अधिकारी हे सर्व या समितीमध्ये सदस्य असतील. तर ज्या विभागातील पदे भरावयाची आहेत त्या विभागातील जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख संलग्न उपसंचालक भूमि अभिलेख हे सदस्य सचिव या समितीमध्ये असतील.
जमाबंदी आयुक्त आणि भूमि अभिलेख संचालक यांच्या अनुपस्थितीत निवड समितीचे अध्यक्ष म्हणून अप्पर जमाबंदी आणि भूमि अभिलेखचे अतिरिक्त संचालक कामकाज पाहतील. निवड समितीमध्ये आवश्यकतेप्रमाणे अतिरिक्त सदस्यांची निवड करण्याची मुभा जमाबंदी आयुक्त आणि भूमि अभिलेख संचालक यांना राहील. ज्या विभागात पदे भरण्यात येणार आहेत त्या विभागात निवड समितीचे सदस्य म्हणून अन्य विभागातील भूमि अभिलेख उपसंचालक यांची नियुक्ती जमाबंदी आयुक्त आणि भूमि अभिलेख संचालक यांच्या स्तरावरुन करण्यात येईल. असे शासन आदेशात नमूद आहे.