मुंबई – गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी शनिवारी राजीनामा दिल्यानंतर आज भाजपच्या आमदारांच्या बैठकीत भूपेंद्रभाई पटेल यांची मुख्यमंत्रीपदासाठी निवड करण्यात आली. या पदासाठी नितीन पटेल, मनसुख मांडविया, सी. आर. पाटील, गोरधन जडाफिया यांचे नाव चर्चेत होते. पण, त्यात पटेल यांना संधी मिळाली. पटेल हे अनुभवी व लेवा पाटील समाजाचे नेते असल्यामुळे आगामी निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन ही निवड केल्याचे बोलले जात आहे.
शनिवारी रुपाणी यांनी आपला राजीनामा राज्यपाल यांच्याकडे सोपावल्यानंतर गुजरातमध्ये राजकीय घडामोडीला वेग आला होता. सायंकाळीच नेता निवड होणार असल्याचे बोलले जात होते. पण, ती आज करण्यात आली. रुपाणी यांच्या नेतृत्वात भाजपने गुजरातमध्ये १८२ पैकी ९९ जागांवर विजय प्राप्त करुन सत्ता मिळवली होती. आता आगामी निवडणूक भाजप पटेल यांच्या नेतृत्वाखाली लढवणार आहे.