नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI) एक ऐतिहासिक निर्णय घेत १५ ऑगस्ट २०२५ पासून FASTag आधारित वार्षिक पास योजना सुरू करण्याची घोषणा केली आहे. या योजनेअंतर्गत, अवघ्या ३ हजार रुपयांत खासगी वाहनचालकांना (कार, जीप, व्हॅन इत्यादी) देशभरातील राष्ट्रीय महामार्गांवर टोल प्लाझावर प्रवासाचा लाभ घेता येईल. हे पास सक्रिय झाल्यापासून एक वर्ष किंवा २०० प्रवासांपर्यंत, यापैकी जे आधी पूर्ण होईल, तोपर्यंत वैध असेल, अशी माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी एक्स या सोशल मीडियावर दिली आहे.
मंत्री नितीन गडकरी यांनी दिलेल्या माहितीनुसार ही योजना केवळ गैर-व्यावसायिक खासगी वाहनांसाठी आहे आणि यामुळे टोल भरण्याची प्रक्रिया सुलभ होईल. यामुळे ६० किलोमीटर परिसरातील टोल प्लाझांवरील स्थानिक वाहनचालकांच्या दीर्घकाळापासूनच्या तक्रारींचे निराकरण होण्याची अपेक्षा आहे. या पासमुळे टोल प्लाझांवरील प्रतीक्षा वेळ कमी होईल, गर्दी कमी होईल आणि वादविवाद संपुष्टात येतील, परिणामी प्रवाशांना जलद आणि सुलभ प्रवासाचा अनुभव मिळेल.
या वार्षिक पासचे सक्रियण आणि नूतनीकरण सुलभ करण्यासाठी NHAI आणि केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालय (MoRTH) लवकरच ‘हायवे ट्रॅव्हल ॲप’ आणि त्यांच्या अधिकृत वेबसाइटवर एक स्वतंत्र लिंक उपलब्ध करणार आहे. यामुळे वाहनचालकांना पास मिळवणे आणि त्याचे व्यवस्थापन करणे सोपे होईल. ही योजना विशेषतः नियमित प्रवास करणाऱ्या खासगी वाहनचालकांसाठी वरदान ठरेल, कारण एकाच लेनदेनातून वर्षभर टोल भरण्याची सुविधा मिळेल.
NHAI ने या योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी सर्व संबंधित यंत्रणांना तयारी करण्याचे निर्देश दिले आहेत. या उपाययोजनेमुळे टोल संकलन प्रक्रिया अधिक पारदर्शी आणि कार्यक्षम होईल, तसेच लाखो वाहनचालकांना सुगम प्रवासाचा अनुभव मिळेल. ही योजना राष्ट्रीय महामार्गांवरील प्रवासाला नवी दिशा देणारी ठरेल, अशी अपेक्षा आहे.
[email protected]