नवी दिल्ली – काही दिवसांपुर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट झाल्यानंतर आता भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व शरद पवार यांची भेट झाली आहे. दिल्लीतील शरद पवार यांच्या ६ जनपथ या निवासस्थानी ही भेट झाल्याचे सांगितले जात आहे. विशेष म्हमजे ही भेट आज नाही तर दोन दिवसांपूर्वी झाली असून त्याबाबत कमालीची गुप्तता पाळण्यात आली आहे. त्यामुळे ही भेट का झाली, त्यात काय चर्चा झाली याबाबत तर्कवितर्कांना उधाण आले आहे. मात्र, ही सदिच्छा भेट असल्याचे सांगितले जात असले तरी ‘दाल मे कुछ काला है’ असे बोलले जात आहे. महाराष्ट्रात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांनी महाविकास आघाडी स्थापन करुन सत्ता स्थापन केली आहे. भाजप आणि शिवसेना यांच्यातील युती तुटली आहे. अशा पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी आणि भाजप नेत्यांच्या गाठीभेटी वाढल्याने भाजपकडून पुन्हा महाराष्ट्रात सत्ता स्थापनेच्या हालचाली सुरू केल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, याप्रकरणी दोन्ही नेते काय खुलासा करतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.