नागपूर – भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या (साई) अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे काम वेगाने पूर्ण करण्याचे निर्देश केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. श्री. नितीन गडकरी यांनी आज (रविवार) प्रशासनाला दिले.
नागपूर व आसपासच्या शहरांमधील होतकरू खेळाडूंना दर्जेदार प्रशिक्षण मिळावे आणि त्यांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये सहभागी होता यावे, या उद्देशाने साईचे केंद्र नागपुरात सुरू करण्याचा निर्णय झाला. यासंदर्भात पूर्व नागपुरातील वाठोडा परिसरात साईचे केंद्र आणि राष्ट्रीय क्रीडा प्रशिक्षण केंद्र (एनएससीआय) होणार आहे. या प्रकल्पाच्या उभारणीसाठी आवश्यक कार्यवाही वेगाने पूर्ण करण्याच्या सूचना ना. गडकरी यांनी रविवारी झालेल्या बैठकीत दिल्या. या बैठकीला आमदार कृष्णा खोपडे, आमदार प्रवीण दटके, आमदार विकास कुंभारे, महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. अभिजित चौधरी, नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती मनोज कुमार सूर्यवंशी, साईच्या नागपूर प्रकल्पातील अधिकारी आदींची उपस्थिती होती. या कामासाठी भूसंपादनाची प्रक्रिया तातडीने व्हायला हवी.
महानगरपालिकेच्या अख्त्यारित येणाऱ्या जागेवर कुणाचे अतिक्रमण असेल तर ते तातडीने हटवा. या कामांमध्ये दिरंगाई होता कामा नये, असेही ना. गडकरी यांनी अधिकाऱ्यांना सांगितले. हा प्रकल्प पूर्ण झाल्यावर शहरातील आणि ग्रामीण भागातील खेळाडूंना दर्जेदार प्रशिक्षणासाठी एक मोठे व्यासपीठ उपलब्ध होणार आहे. याठिकाणी उत्तम खेळाडू तयार झाले तर शहराचीच प्रतिष्ठा वाढणार आहे. त्यामुळे हा प्रकल्प नियोजित वेळेत पूर्ण होण्यासाठी आवश्यक सगळी कार्यवाही करा, असेही. ना. गडकरी प्रशासनाला म्हणाले.
Nitin Gadkari gave this direction to the administration