नागपूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी आज एक मोठी घोषणा केली. नागपुरात लवकरच हवेतून धावणारी बस असेल असे ते म्हणाले. ही बस म्हणजे केबल बस राहणार आहे. उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे सर्वप्रथम ही बस धावणार आहे, त्यानंतर ती नागपुरात असणार आहे. या बसचा आराखडा तयार करावा, असे निर्देश गडकरींनी अधिकाऱ्यांना दिले आहेत. जवळपास ४० सीटर असलेली ही केबल बस सध्या फिलिपाईन्समध्ये कार्यरत आहे. त्याच पद्धतीची केबल बस नागपूरमध्ये धावेल, असे गडकरी म्हणाले. नागपूरमधील पारडीहून रिंगरोड द्वारे ही बस लंडन स्ट्रीट पर्यंत धावेल. तसेच हिंगणा टी पॉईंट, डिफेन्सवाडी येथून थेट व्हरायटी चौकापर्यंत ही बस असेल असे गडकरींनी स्पष्ट केले.
विदर्भात विपुल प्रमाणात खनिज आणि जंगल अशी नैसर्गिक साधनसंपत्ती उपलब्ध असून त्यावर आधारित उद्योग -व्यवसाय निर्मिती होणे आवश्यक आहे. विदर्भातील आर्थिक विकास आणि रोजगार निर्मितीची क्षमता याबाबत विदर्भातील सर्व खासदारांनी एकत्र येऊन विचारमंथन करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितिन गडकरी यांनी आज नागपूर मध्ये केले. नागपूर मध्ये केंद्रीय सूक्ष्म लघु आणि मध्यम मंत्रालयाच्या एम एस एम ई विकास संस्था नागपूर द्वारे आयोजित आणि केंद्रीय मंत्री तसेच नागपूरचे खासदार नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या ‘खासदार औद्योगिक महोत्सवाचे’ आयोजन येत्या 12 ते 14 मार्च पर्यंत एमआयडीसी हिंगणा येथील एम आय ए हाऊस येथे करण्यात येणार आहे. याबद्दल प्रसारमाध्यमांना माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत ते आज बोलत होते. याप्रसंगी एम एस एम विकास संस्थेचे संचालक पीएम पार्लेवार, गडचिरोलीचे खासदार अशोक नेते प्रामुख्याने उपस्थित होते. बांग्लादेश हा तयार कपड्याच्या निर्याती मध्ये अग्रेसर असून त्याला कापसाचा पुरवठा सर्वात जास्त विदर्भातून होतो. अमरावतीमध्ये टेक्सटाईल पार्क असून येथे विविध नामांकित 17 टेक्स्टाईल कंपन्या आहेत. विदर्भात विपुल प्रमाणात असणारे कापूस आणि संत्रा यामध्ये मूल्यवर्धन करून रेडीमेड गारमेंटचे उद्योग तसेच प्रक्रिया उद्योग उभारले पाहिजे. विदर्भातील उद्योग त्याच्याशी संबंधित असणाऱ्या यंत्रणा आणि परवानग्या यांच्यामध्ये समन्वय असला पाहिजे असेही गडकरी यांनी यावेळी नमूद केले.
विदर्भामध्ये ग्रीन हायड्रोजनच्या मार्फत चालणारी वाहने संचालित झाली पाहिजे यासाठी महानगरपालिकेने कचरा आणि सांडपाण्यापासून ग्रीन हायड्रोजन प्रकल्प टाकण्याचा आजचा विचार करावा असे त्यांनी सांगितले .नागपुरात असणाररी भारतीय व्यवस्थापन संस्था – आयआयएम सुद्धा उद्योगधंद्याच्या व्यवस्थापनासाठी महत्वाची आहे. नागपुरात असणाऱ्या नाग विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्स, विदर्भ इंडस्ट्रीज असोसिएशन, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ या सगळ्या संस्थांमध्ये समन्वय असणे गरजेचे आहे असेही त्यांनी सांगितले. केबलकारची संकल्पना मांडताना त्यांनी पारडी ते हिंगणा टी पॉइंट येथे केबल वर चालणाऱ्या बससाठी विस्तृत प्रकल्प अहवाल तयार करायला सांगितले असल्याची माहिती दिली. तीन दिवसीय चालनाऱ्या ‘खासदार औद्योगिक महोत्सव’ मध्ये विविध क्षेत्रातील उद्योग, सार्वजनिक उपक्रम मायक्रो स्मॉल मीडियम इंडस्ट्रियल युनिटस, स्टार्ट अप्स माहिती-तंत्रज्ञानाच्या कंपन्या आपले दालन स्थापन करणार आहेत. यादरम्यान राज्य केंद्र शासन, सार्वजनिक क्षेत्र उपक्रम, बहुराष्ट्रीय कंपन्यातील अधिकारी विविध विषयावर आधारित परिसंवादाला संबोधित करणार आहेत .अशा प्रकारच्या महोत्सवाचे आयोजन प्रथमच करण्यात आले असून यामुळे विदर्भातील उद्योग एककांना विपणन तंत्रज्ञान तसेच तंत्रज्ञान वृद्धीसाठी मदत मिळेल अशी माहिती एमएसएमई विकास संस्थेचे संचालक पीएम पार्लेवार यांनी दिली.
https://twitter.com/nitin_gadkari/status/1500387466511290370?s=20&t=Fb7dWj_BhNtHv64MLDYLhA