नागपूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते उद्या (रविवार) मोबाईल मेडिकल युनिट रुग्णवाहिकेचे लोकार्पण झाले. वर्धा मार्गावरील एनरिको हाइट्स येथे हा कार्यक्रम झाला. स्व. भानुताई गडकरी ग्रामीण विकास संस्था व बॉर्डरलेस वर्ल्ड फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने या रुग्णवाहिकेचे संचालन होणार आहे.
नागपूर शहरासह ग्रामीण भागातही आता आरोग्यसेवेचा विस्तार करण्याच्या दृष्टीने ही रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात आली आहे. ग्रामीण भागातील गोरगरीब जनतेला त्याचा नक्की फायदा होईल, असा विश्वास ना. श्री. गडकरी यांनी व्यक्त केला. विशेषतः ग्रामीण भागातील नागरिकांची आरोग्य तपासणी या रुग्णवाहिकेच्या माध्यमातून होईल. पहिल्या टप्प्यात नागपूर जिल्ह्यातील २२ गावांची निवड करण्यात आली आहे. या गावांमध्ये जाऊन रुग्णवाहिकेच्या माध्यमातून रक्त तपासणी, रक्तदाब व मधुमेह तपासणी केली जाणार आहे. विशेष म्हणजे यामध्ये निःशुल्क उपचार व औषधांची सुविधाही नागरिकांना दिला जाणार आहे. ज्या गावात रुग्णवाहिका पोहोचेल तेथील नागरिकांना निःशुल्क ओपीडीची व्यवस्था उपलब्ध करून दिली जाणार आहे.
एचडीएफसी फाउंडेशनच्या सौजन्याने ही रुग्णवाहिका उपलब्ध झाली आहे. स्व. भानुताई गडकरी ग्रामीण विकास संस्थेच्या वतीने कर्ण व नेत्र तपासणीसाठी स्वतंत्र रुग्णवाहिका नागपूरकरांच्या सेवेत आहेत. याशिवाय दिव्यांगांना कृत्रिम अवयव देखील संस्थेच्या माध्यमातून दिले जातात. दिव्यांगांसाठी अवयव प्रत्यारोपणासाठी देखील संस्थेच्या वतीने स्वतंत्र रुग्णवाहिका कार्यरत आहे, हे विशेष. मोबाईल मेडिकल युनिटमुळे ग्रामीण भागातील नागरिकांचीही आरोग्यसेवा होणार आहे.